Satara News : लंपी स्किन नुकसानीबद्दल रुपयाचेही अनुदान नाही; जिल्ह्यात मृत्यूचा आकडा शंभरीकडे

सातारा : लंपी स्किलने गायी बैलांच्या मृत्यूने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यावर्षी जिल्ह्यात जनावरांच्या मृत्यूचा आकडा शंभरीकडे गेला असल्याने पशुपालक संकटात आहे. पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना भरपाई म्हणून आर्थिक मदत झाली होती. मात्र, वर्षभरापासून लंपीने मृत्यू झालेल्या जनावरांची
भरपाई देण्यास राज्य सरकारने हात आखडता घेतला असून या वर्षात शेतकऱ्यांना एक रुपयाचेही अनुदान मिळाले नाही. त्यामुळे पशुपालकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
जिल्ह्यात जानेवारी २०२४ पासून ऑगस्ट महिन्यापर्यंत सुमारे ९० जनावरांचा मृत्यू होऊनही राज्य सरकारकडून एक रुपयाचे अनुदान शेतकऱ्यांना मिळाले नाही. राज्य सरकार विविध योजनांची घोषणा करत असूनही त्या राबविताना सरकारची दमछाक होत आहे. विधानसभेनंतर महायुतीने लाडकी चहीण योजना सुरू केल्याने राज्य सरकारला इतर योजनांना निधी देताना नाकीनऊ आले आहे. लंपी आजाराने जनावरांचा मृत्यू झाल्यानंतर पंचनामा करून त्याचा अहवाल पशुसंवर्धन विभागाकडे पाठविला जात होता.
त्यानंतर अनुदान जिल्हास्तरावर आल्यावर शेतकऱ्यांना दिले जात होते. मात्र, आता वर्षभरापासून अनुदान न आल्याने लंपी आजाराने मृत्यू झाल्यास पंचनामाही होत नसल्याचे समोर आले आहे. अनुदानच नाही तर पंचनामा करून काय फायदा? असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे.
ग्रामीण भागात एक गाय व दोन बैल एखाद्या कुटुंबात असल्यास चार माणसांचा उदरनिर्वाह चालतो. जसीं गायीच्या दुधातून १५ ते १८ हजार मिळतात, तर बैलजोडीद्वारे काम करताना शेतकरी किमान घरच्या शेतात काम करून सुमारे दहा हजारांची बचत करतो.
त्यामुळे एखाद्या कुटुंबातील गायी अथवा बैल लंपीने मृत्यू झाल्यास उदरनिर्वाहात अडसर होतो. शेतकरी आर्थिक संकटात असताना लंपी आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे राज्य सरकारने लंपीने मृत्यू झालेल्या जनावरांसाठी भरपाई देणे आवश्यक आहे. सरकारकडून मदत मिळत नसल्याने पशुपालकांमध्ये सरकारविरोधात रोष दिसून येत आहे.
अशी आहे स्थिती…
जानेवारी ते डिसेंबर
२०२३ : सुमारे दीड हजार जनावरांचा मृत्यू
पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना सुमारे अडीच कोटी भरपाई
भरपाई गायींना ३० हजार भरपाई बैल २५ हजार, वासरू अथवा खाँड : १६ हजार
जानेवारी २०२५ ते ऑगस्ट २०२५ : सुमारे ९० जनावरांचा मृत्यू
सद्यः स्थितीत जिल्ह्यात ३५३ जनावरे बाधित
सातारा, कोरेगाव, माण, खटाव व कोरेगाव तालुक्यात लंपीचा प्रादुर्भाव अधिक असून या आजाराला रोखण्यासाठी लसीकरणही झाले आहे. पशुवैद्यकीय दवाखान्यात लंपीच्या जनावरांवर मोफत उपचार केले जात आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पशुसंवर्धन विभाग प्रयत्न करत आहे.
– डॉ. दिनकर बोडे, उपायुक्त, पशुसंवर्धन





