Satara News : जिल्ह्यात आठ तालुक्यात लंपी स्किनचा प्रादुर्भाव, आत्तापर्यंत २६ जनावरांचा मृत्यू

सातारा : सातारा जिल्ह्यात जावळी, महाबळेश्वर, वाई तालुके वगळता सर्वत्र लंपी स्किनने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. आत्तापर्यत ५३७ जनावरे बाधित आढळली असून २६ जनावरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. २९९ जनावरे उपचाराने बरी झाली असून २१२ जनावरांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार यांनी दिली.
सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तुरळक प्रमाणात लंपी स्किन चर्मरोगाची जनावरे आढळून आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने युध्दपातळीवर पावले उचलत लसीकरण मोहिमेला गती दिली. सध्य परिस्थितीत लंपी स्किनने जिल्ह्यात ५३७ जनावरे बाधित आढळून आली असून पशुसंवर्धन विभागाने गतीने उपचार केल्यानंतर २९९ जनावरे बरी झाली आहेत.
२६ जनावरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून २१२ जनावरांवर उपचार सुरु आहेत. सध्या सातारा ६४, पाटण ३, माण ४६, कोरेगाव ४०, खटाव २१, खंडाळा ३, कराड ३१, फलटण ४ अशी २१२ जनावरे बाधित आहेत. पशुधन विकास अधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत समिती यांचा आढावा घेऊन लंपी चर्मरोग लसीकरण करण्याबाबत सूचना देवून विविध उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती डॉ. विनोद पवार यांनी दिली.
जिल्ह्यात लंपी चर्मरोग रोगाचा वाढता प्रादुर्भाव बघता पशुसंवर्धन विभागाकडून पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून गोट पॉक्स लंपी चर्मरोग लसीकरण करण्यात येत आहे. सातारा, माण, कोरेगाव तालुक्यातील वाढता प्रादुर्भाव पाहता लसीकरण मोहिमेला गती देण्यात आली आहे. पशुपालकांनी घाबरुन न जाता नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.
– डॉ. विनोद पवार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी





