Satara Half Hill Marathon: धावताना अचानक छातीत कळ अन्…; सातारा मॅरेथॉनमध्ये पुण्याच्या धावपटूचा मृत्यू
Satara Half Hill Marathon: बोगदा परिसरात अचानक त्रास जाणवल्याने डॉक्टरांनी घटनास्थळीच दिला सीपीआर; उपचारादरम्यान पुण्याच्या धावपटूने घेतला अखेरचा श्वास.

Satara Half Hill Marathon – सातारा हाफ हिल मॅरेथॉनमध्ये उत्साहाने धावत आलेल्या पुण्याच्या संजय कदम यांना बोगदा परिसरातच अचानक हृदयविकाराचा त्रास जाणवल्यानंतर त्यांच्यावर घटनास्थळी उपस्थित डॉक्टरांनी तातडीने सीपीआरसह प्राथमिक उपचार केले. त्यानंतर रुग्णवाहिकेतून प्लस हॉस्पिटलमध्ये दाखल करून अँजिओप्लास्टी करण्यात आली; मात्र उपचार सुरू असतानाच काही तासांनी त्यांचा मृत्यू झाला.
सातारा हाफ मॅरेथॉनचे यंदाचे पंधरावे वर्ष आहे. स्पर्धेदरम्यान प्रथमच धावपटूचा मृत्यू झाल्याने आयोजक, सहभागी धावपटू आणि सातारकरांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. संजय कदम यांना बोगदा परिसरात त्रास जाणवताच त्यांच्या मागून धावत असलेले डॉ. मुजावर, प्लस हॉस्पिटलचे डॉ. कौशिक पाटील आणि मीनाक्षी हॉस्पिटलचे डॉ. प्रतापराव गोळे यांनी त्यांच्याकडे धाव घेतली. रुग्णवाहिका येईपर्यंत सीपीआर देत त्यांनी त्यांची प्रकृती स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला.
रुग्णवाहिकेतही उपचार सुरू ठेवण्यात आले. प्लस हॉस्पिटलमध्ये तपासणीत रक्तवाहिनी ब्लॉक झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तातडीने अँजिओप्लास्टी करण्यात आली. डॉ. संग्राम देशमुख, डॉ. ओंकार पाटील यांच्यासह वैद्यकीय कर्मचार्यांनीही उपचारासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, काही तासांनी कदम यांची प्राणज्योत मालवली.





