Warkari Heart Attack: दिवे घाटात मृत्यूशी झुंज! वारकऱ्याला हृदयविकाराचा झटका; ‘सीपीआर’ देऊन आरोग्य पथकाने वाचवले प्राण
Warkari Heart Attack: प्राथमिक उपचारानंतर रुग्णाला त्वरित मोठ्या वैद्यकीय संस्थेत दाखल केले; आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचे सर्वत्र कौतुक.

Warkari Heart Attack – आषाढी वारीदरम्यान एका वारकऱ्याला हृदयविकाराचा झटका आल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली. मात्र, आरोग्य विभागाच्या तत्परतेमुळे वारकऱ्याला तातडीने जीवनरक्षक उपचार मिळाले, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांनी दिली. कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, आरोग्यवर्धिनी केंद्र दिवे तसेच त्यांच्या आरोग्य पथकाने प्रसंगावधान राखत तात्काळ सीपीआर देऊन प्राथमिक जीवनरक्षक उपचार केले.
त्यानंतर रुग्णाला पुढील उपचारासाठी त्वरित वैद्यकीय संस्थेत हलविण्यात आले. आरोग्य यंत्रणेची सज्जता, कौशल्य आणि सेवाभाव यामुळे आपत्कालीन परिस्थितीत योग्य वेळी उपचार मिळाल्याने वारकऱ्याचा जीव वाचण्यास मदत झाली. या तत्पर, संवेदनशील सेवेसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांचे अभिनंदन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांनी दिली.
पालिकेचे पथक वारीसमवेत
पालखी सोहळ्यानिमित्त पुणे महानगरपालिकेने सहा सदस्यीय वैद्यकीय पथकाची नियुक्ती केली आहे. आयुक्तांच्या आदेशानुसार हे पथक पुणे ते पंढरपूर दरम्यान पालखीसोबत राहून वारकऱ्यांना वैद्यकीय सेवा देणार आहे. वैद्यकीय पथकासोबत आवश्यक औषधसाठा असून पथकामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज बागडे, फार्मासिस्ट नातू युवराज, रुग्णवाहिका चालक (ड्रायव्हर) ओंकार बबडे,
मुकादम प्रवीण शिंदे, आरोग्य निरीक्षक किशोर थोरात आणि शिपाई संतोष साठे यांचा समावेश आहे. पथकाने पालखीसोबत पुणे ते पंढरपूर प्रवासादरम्यान उपस्थित राहून आवश्यक वैद्यकीय सेवा द्याव्यात. तसेच सेवाकालाचा अहवाल आरोग्य कार्यालयाकडे सादर करावा, असे आदेश आरोग्य अधिकारी डॉ. नीना बोराडे यांनी दिले आहेत.



