Satara: आठ युवकांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार आसगाव, मर्ढे व खटाव गावांवर दुःखाचा डोंगर; मध्यरात्री गावागावांत उसळला आक्रोश
Satara साताऱ्यातील हे युवक कर्दे बीच येथे फिरण्यासाठी गेले होते. मात्र परतीच्या प्रवासादरम्यान आंबेनळी घाटात त्यांची स्कॉर्पिओ कार सुमारे पंधराशे फूट खोल दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच महाबळेश्वर व प्रतापगड ट्रेकर्सच्या बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कठीण परिस्थितीत सर्व मृतदेह बाहेर काढले.

Satara: पोलादपूरजवळील धोकादायक आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ कार खोल दरीत कोसळून मृत्यूमुखी पडलेल्या साताऱ्यातील आठ युवकांवर सोमवारी मध्यरात्री उशिरा अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या भीषण दुर्घटनेमुळे आसगाव, मर्ढे आणि खटाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.
साताऱ्यातील हे युवक कर्दे बीच येथे फिरण्यासाठी गेले होते. मात्र परतीच्या प्रवासादरम्यान आंबेनळी घाटात त्यांची स्कॉर्पिओ कार सुमारे पंधराशे फूट खोल दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच महाबळेश्वर व प्रतापगड ट्रेकर्सच्या बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कठीण परिस्थितीत सर्व मृतदेह बाहेर काढले.
मर्ढे गावातील दोन युवकांवर तसेच खटाव येथील एका युवकावर पहाटे अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अंतिम निरोप दिला. संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून या दुर्दैवी घटनेने सातारा जिल्हा हादरून गेला आहे.
या अपघाताने आसगाव, मर्ढे व खटाव येथील नागरिकांचे हृदय पिळवटून गेले. मातापित्यांसह नातेवाईकांचा आक्रोश सर्वांच्या डोळ्यात आसवांचा पूर आणत होता. युवकांच्या कुटुंबीयांना आधार देताना सर्वांच्या मनात शोक दाटलेला होता. अशा शोकाकूल वातावरणात मृत युवकांना अखेरचा निरोप देण्यात आला.
आसगाव शोकमग्न
मृतांपैकी पाच युवक आसगाव येथील असल्याने गावात शोकमय वातावरण निर्माण झाले होते. रात्री सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास मृतदेह गावात पोहोचताच नातेवाईकांचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. त्यानंतर दोन ट्रॅक्टर ट्रॉलींमधून मृतदेह स्मशानभूमीत नेण्यात आले आणि एकाच वेळी पाच युवकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.





