Satara Forest Department : माणदेशातील माळरानाला मिळणार ‘कवच’! किरकसाल-कुकुडवाडसाठी वन विभागाचा मोठा प्लॅन तयार
Satara Forest Department : किरकसाल-कुकुडवाड क्षेत्राला 'संवर्धन राखीव' दर्जा मिळवून देण्यासाठी तज्ज्ञ समिती गठीत; उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांचे निर्देश.

Satara Forest Department – माणदेशातील समृद्ध जैवविविधता, दुर्मिळ वन्यजीव आणि गवताळ प्रदेशाच्या संरक्षणासाठी सातारा वन विभागाने अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सातारा येथील उपवनसंरक्षक श्री. अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली ‘किरकसाल-कुकुडवाड’ क्षेत्राला ‘संवर्धन राखीव’ दर्जा मिळवून देण्यासह या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
शुक्रवारी (८ मे) सातारा वनभवन येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत किरकसाल वन्यजीव संवर्धन प्रकल्पाचे चिन्मय सावंत व वन्यजीव अभ्यासक अर्णव गंधे यांनी या परिसंस्थेच्या संवर्धनाबाबत सविस्तर सादरीकरण केले. बैठकीतील ६ प्रमुख निर्णयांची अंमलबजावणी होणार आहे. यामध्ये . संवर्धन राखीव क्षेत्राचा दर्जा व रस्ता प्रकल्प – किरकसाल-कुकुडवाड माळरान क्षेत्राला ‘संवर्धन राखीव’ दर्जा मिळवून देण्यासाठी वनविभागामार्फत तज्ज्ञ समिती गठीत केली जाणार आहे.
तसेच कुकुडवाड राखीव वनातून जाणाऱ्या नवीन महामार्ग प्रकल्पाबाबत पर्यावरणाचा व जैवविविधतेचा समतोल राखून कसे काम करता यावर सविस्तर चर्चा झाली.
कॉफी टेबल बुकची निर्मिती – माणदेश आणि किरकसाल संवर्धन प्रकल्पाची माहिती, येथील जैवविविधता आणि वैशिष्ट्ये जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एका आकर्षक ‘कॉफी टेबल बुक’चे प्रकाशन केले जाणार आहे.
क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची क्षमता बांधणी – वन्यजीव व्यवस्थापनासाठी सातारा प्रादेशिक वनांतर्गत सर्व कर्मचाऱ्यांसाठी विशेष ‘क्षमता बांधणी कार्यशाळा’ घेतली जाईल. यात कॅमेरा ट्रॅपिंग, अत्याधुनिक उपकरणांचा वापर आणि माळरान संनियंत्रणाचे शास्त्रीय प्रशिक्षण दिले जाईल. स्थानिक गवताळ प्रदेशाचा विकास – माळरानावरील आक्रमक (Invasive) वनस्पती हटवून तिथे स्थानिक गवत आणि ‘कॅपॅरिस’ तराटी, वाघाटी (Capparis) सारख्या स्थानिक झुडपांची लागवड केली जाईल.
वृक्षारोपणासाठी ‘मियावाकी’ सारख्या पद्धती टाळून केवळ स्थानिक प्रजातींनाच प्राधान्य देण्याचे निश्चित करण्यात आले.बिबट्या गणना – भविष्यात कराड-पाटण वनविभागांतर्गत बिबट्यांची शास्त्रीय गणना (Leopard Census) करण्याचा प्रस्ताव या बैठकीत विचाराधीन घेण्यात आला आहे.वन्यजीव सफारीचे नियोजन – इंदापूरच्या कडबनवाडी माळरान सफारीच्या धर्तीवर किरकसाल-कुकुडवाड क्षेत्रातही ‘वन्यजीव सफारी’ सुरू करण्याच्या शक्यतांची चाचपणी सुरू झाली असून, यामुळे निसर्ग पर्यटनाला चालना मिळणार आहे.
“माणदेशातील माळरान ही एक अत्यंत महत्त्वाची परिसंस्था आहे. स्थानिक लोकसहभाग आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून या क्षेत्राचा विकास करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. प्रस्तावित संवर्धन राखीव दर्जामुळे या भागातील लांडगे आणि इतर वन्यजीवांना कायमस्वरूपी संरक्षण मिळेल.”
– अमोल सातपुते (उपवनसंरक्षक, सातारा)






