Satara News : दप्तर दिरंगाईचा परिणाम भोगतंय ‘महादरे’! फुलपाखरू संवर्धन राखीव

प्रगती जाधव पाटील / सातारा : सातारा शहराच्या उशाला असलेल्या महादरेच्या जंगलाला जून 2023 मध्ये संवर्धन राखीवचा दर्जा मिळाला. देशातील पहिले ‘फुलपाखरू संवर्धन राखीव’ असा डंका सातारकरांनी अभिमानाने मिरवला खरा; परंतु हा दर्जा असलेल्या महादरेच्या जंगलाचा व्यवस्थापन आराखडाच दीड वर्ष झाले रेंगाळला आहे. एकीकडे शासनस्तरावर पर्यटनवाढीसाठी प्रयत्न होत असताना, शासन दरबारी रखडलेल्या आराखड्याला तातडीने मंजुरी देण्यात यावी, अशी पर्यावरणप्रेमींची मागणी आहे.
महादरेचे जंगल राजवाड्यापासून अवघ्या अडीच किलोमीटर अंतरावर आहे. महादरे येथील जैवविविधता अलौकिक आहे. पश्चिम घाट आणि पूवकडील दख्खनचे पठार यांना सांधणारा प्रदेश, म्हणून महादरेच्या जंगलाची ओळख आहे. महादरेमध्ये पश्चिम घाट व दख्खनच्या पठारातील दोन्ही प्रकारच्या जैवविविधतेचा मिलाफ पाहायला मिळतो.
महादरे येथील वन्यजीवांसह पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी या राखीव क्षेत्राला संवर्धन राखीवचा दर्जा देण्याची गरज पुढे आली. महादरे इकॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (मेरी) चे अध्यक्ष सुनील भोईट, प्रा. डॉ. प्रतिमा पवार व प्रा. डॉ. नेहा बेंद्रे आणि त्यांच्या टीमने अभ्यासाअंती वन विभागामार्फत एक प्रस्ताव तयार केला.
राज्य वन्यजीव मंडळाच्या मुंबईत झालेल्या बैठकीत महादरेला ‘फुलपाखरू संवर्धन राखीव’ म्हणून मान्यता मिळाली. मात्र, गेल्या दीड वर्षात महादरेच्या 106 हेक्टर क्षेत्राच्या संवर्धनाचा आराखडा वन विभागाला करता आलेला नाही. यवतेश्वर घाटाच्या मध्यापासून भैरोबा टेकडीपर्यंत सुमारे 106 हेक्टर वनक्षेत्रावर वन विभागाची मालकी आहे. त्याचे संरक्षण, संवर्धन आणि संगोपन यांचीही जबाबदारी वन विभागाची आहे.
महादरेत फुलपाखरांच्या 160 प्रजाती
पश्चिम घाटात 360 प्रजातींची फुलपाखरे आढळतात. त्यापैकी 160 प्रजाती एकट्या महादरेमध्ये पाहायला मिळतात. यातील ऑर्किड टिट आणि व्हाइट टिप्ड लाइन ब्ल्यू ही दोन फुलपाखरे परिशिष्ट 1 (शेड्युल 1) मध्ये गणली जातात. वाघाच्या परिशिष्ट 1 मध्ये यातील काही फुलपाखरांचा समावेश आहे.
ही दोन्ही वैशिष्ट्यपूर्ण फुलपाखरं वाघाच्या पंगतीत जाऊन बसली आहेत. प्राधान्यक्रमाने ज्या वनस्पती अगर वन्यजीव जपण्याची गरज आहे, त्यांच्यासाठी विविध परिशिष्टांची रचना करण्यात आली आहे. परिशिष्ट एकमधील 2 व परिशिष्ट तीन व चारमधील 16 फुलपाखरं एकट्या महादरेत आढळतात.
आराखड्याशिवाय संवर्धन अशक्य
राखीव क्षेत्राचा दहा वर्षांचा व्यवस्थापन आराखडा केला जातो. त्यातून अधिवास विकास, पाणवठे व कुरण विकासाची कामे केली जातात. माहिती केंद्र, निरीक्षण मनोरे यांची उभारणी, संरक्षक कुट्या उभारून, कर्मचारी नेमले जातात. निसर्गवाटांचा विकास करून, निसर्ग पर्यटनाला चालना मिळते. या क्षेत्राचे संरक्षण, संगोपन आणि नैसर्गिक विकासासाठी मनुष्यबळाची आणि आर्थिक तरतूद शासन करते. ग्रामस्थांच्या सहभागातून व्यवस्थापन समिती काम पाहते. त्यातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळतात.
महादरे संवर्धन राखीव करण्यासाठीचा आराखडा काही महिन्यांपूर्वीच तयार करण्यात आला आहे. जिल्हा पातळीवरील आवश्यक त्या सर्व बाबी पूर्ण करून, हा आराखडा पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. आगामी दोन महिन्यांमध्ये या आराखड्याचा विषय मार्गी लागण्याची शक्यता आहे.
– प्रदीप रौंदाळ, सहाय्यक वनसंरक्षकसातार्याच्या समृद्ध जैवविविधतेचे प्रतीक असलेल्या महादरे जंगलाला फुलपाखरू संवर्धन राखीव दर्जा मिळविण्यासाठी सर्वांचेच प्रयत्न महत्वपूर्ण ठरले. शासनाच्या पातळीवर आराखडा मंजूर झाल्यास संवर्धन करण्यासाठी उपाय करणे शक्य होईल.
– सुनील भोईटे, अध्यक्ष, मेरी.





