Satara Elections – “सात फेब्रुवारी रोजी होत असलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती साठीच्या निवडणुका शांततेत आणि यशस्वीपणे पार पाडाव्यात. त्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी झाली असून जनतेने शांततेत निवडणुका पार पडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे,” असे आवाहन सहायक निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीमती उज्ज्वला गाडेकर यांनी केले आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर समाजातील विविध घटकांना आवाहन करताना त्या म्हणाल्या,” जिल्हा परिषद ,पंचायत समिती साठीच्या निवडणुका 7 फेब्रुवारी रोजी होत असून मतमोजणी 9 फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. निवडणुकीच्या संपूर्ण व्यवस्थेसाठी विशिष्ट कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. आचारसंहिता, एक खिडकी, जनजागृती, मनुष्यबळ अशा विविध कक्षातून निवडणूक नियोजन, नियंत्रण आणि व्यवस्थापन करण्यात आले आहे. निवडणूक हा संघर्ष नसून लोकशाहीचा उत्सव आहे, अशा भावनेतून जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे.प्रशासन, पोलीस यंत्रणा, राजकीय पक्ष व उमेदवार, मतदार तसेच समाज आणि माध्यमे अशा सर्वच घटकांनी परस्पर सामंजस्याने आपली भूमिका पार पाडल्यास निवडणुका यशस्वीरित्या पार पडणार आहेत. सोशल मीडियाचा योग्य वापर करून सत्य माहिती हीच प्रसारित करावी. शंभर टक्के मतदान करून लोकशाही बळकट करा मतदारांनी निवडणूक काळात कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणत्याही निवडणूक विषयक शंकेच्या समाधानासाठी प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधावा. आचारसंहिता पालन करावी. संयम आणि शिस्त पाळावी. दुर्दैवाने कोणताही वाद निर्माण झाल्यास शांतता भंग होऊ न देता कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा व तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा. शंभर टक्के मतदान करून लोकशाही बळकट करावी, असे आवाहन देखील श्रीमती गाडेकर यांनी केले आहे.