Satara Crime | म्युझिक अल्बममध्ये संधी देतो म्हणत युवतीवर अत्याचार ; तरुणावर गुन्हा दाखल

प्रभात वृत्तसेवा
कराड – म्युझिक अल्बममध्ये कामाची संधी देण्याच्या बहाण्याने परजिल्ह्यातील युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी विशाल दीपक (वय 29, रा. विद्यानगर, कराड) याच्यावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशालने आपली बदनामी करून, पाठलाग केल्याचे पीडित युवतीने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, पीडित युवती पुणे येथे नोकरी करत आहे. तिची सोशल मीडियाद्वारे विशालशी ओळख झाली. म्युझिक अल्बममधील गाण्यात काम करण्याची संधी देऊ, असे सांगून, विशालने तिला कराडला बोलावून घेतले. अल्बममध्ये काम केल्यानंतर 9 जून रोजी विशालने पीडित युवतीला जबरदस्तीने कराड-विटा मार्गालगत सैदापूर येथे शुभम रेसिडेन्सी परिसरातील एका घरात नेले.
तेथे त्याने युवतीवर अत्याचार केला. त्यानंतर पीडित युवती पुण्याला निघून गेली. मात्र, काही दिवसांनी विशालने पुणे येथे जाऊन, पीडितेला प्रेमसंबंध कायम ठेवण्यासाठी धमकावले. युवतीने नकार दिल्याने, विशालने तिची बदनामी केली. पीडित युवती पुणे येथे काम करत असलेल्या कंपनीच्या परिसरात 17 ऑगस्ट रोजी जाऊन, तिचा पाठलाग केला. याबाबत पीडित युवतीने पुण्यातील चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अत्याचाराची घटना कराड परिसरात घडल्याने चंदननगर पोलिसांनी हा गुन्हा कराड शहर पोलिसांकडे वर्ग केला आहे.





