Drugs Seized – शेंद्रे-सोनगाव रस्त्यावर कराड बाजकडून आलेल्या कार (एमएच-47-के-1619) मधून 12 ग्रॅम वजनाचे चार लाख 80 हजार रुपये किमतीचे ब्राऊनिश हेरॉईन सातारा तालुका पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने मंगळवारी (दि. 7) रात्री जप्त केले. याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, अंमली पदार्थ विक्रीसाठी दोन जण सातार्याकडे मंगळवारी (दि. 7) सायंकाळी येणार असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे हवालदार राजू शिखरे यांना गोपनीय बातमीदाराकडून मिळाली होती. त्यांनी पोलीस निरीक्षक नीलेश तांबे यांना माहिती दिल्यावर, त्यांच्या सूचनेनुसार गुन्हे प्रकटीकरणचे सपोनि काटकर, पोलीस उपनिरीक्षक अभिजित गुरव, मुजावर, वाहतूक शाखेचे हवालदार मालोजी चव्हाण, किरण जगताप, संदीप आवळे, गुन्हे प्रकटीकरणचे अंमलदार मनोज गायकवाड, प्रदीप मोहिते, दादा स्वामी, संदीप पांडव, सुनील भोसले, उमेश बगाडे यांच्या पथकाने शेंद्रे-सोनगाव रस्त्यावर सापळा लावला. पोलिसांनी रात्री 9 च्या सुमारास कार (एमएच-47-के-1619) अडवून, दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, हेरॉईन विक्रीसाठी आल्याचे संशयितांनी कबूल केले. तहसीलदार समीर यादव, फॉरेन्सिक टीमच्या सपोनि रूपाली मोरे आणि पंचांसमक्ष चार लाख 80 हजार रुपये किमतीचे 12 ग्रॅम बाऊनिश हेरॉईन, चार लाख रुपयांची कार व मोबाईल, असा नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस उपनिरिक्षक अभिजित गुरव तपास करत आहेत.