Satara Crime : दुष्काळात तेरावा महिना! चोरट्यांच्या नव्या आता ‘या’ वस्तू; खटावमधील शेतकरी संतप्त
Satara Crime : उन्हाळ्याच्या तीव्रतेत पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच, मोटर आणि केबल चोरीच्या घटनांनी आर्थिक कंबरडे मोडले.

Satara Crime – खटाव व जाखणगाव शिवारात विजेची मोटार व केबल चोरीच्या घटना वाढू लागल्याने शेतकर्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरट्यांकडून शेतातील विहिरीवरील मोटारी व केबल चोरून नेण्याचे प्रकार सातत्याने घडत असून, शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या प्रकारामुळे आधीच पाण्याअभावी संकटात सापडलेल्या शेतकर्यांच्या अडचणीत भर पडली आहे.
सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून, पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी जिवाची बाजी लावत आहेत. उपलब्ध पाण्यावर पिके जिवंत ठेवण्याचा प्रयत्न सुरू असताना चोरट्यांनी विहिरीवरील मोटारी व केबल चोरून नेल्याने अनेक शेतकर्यांची पिके कोमेजण्याच्या मार्गावर आली आहेत. मागील दहा दिवसांत जाखणगाव शिवारातून दोन मोटारी चोरीला गेल्या असून, दहा ते बारा शेतकर्यांच्या विहिरीवरील वीज केबल चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती शेतकर्यांनी दिली.
या प्रकाराबाबत पोलीस प्रशासनाकडून अद्याप ठोस कारवाई न केल्याची खंत शेतकर्यांकडून व्यक्त होत आहे. आधीच पाण्याची टंचाई, त्यात मोटर-केबल चोरी पिके वाळण्याची वेळ आली आहे. ही परिस्थिती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना ठरत आहे, अशी भावना एका शेतकर्याने व्यक्त केली. दरम्यान, वाढत्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशीही मागणी जाखणगाव परिसरातील शेतकर्यांकडून होत आहे.





