Satara Crime | लोणंद एसटी स्थानकात चोरी ; व्यापार्याला चोरट्यांनी गंडवलं

प्रभात वृत्तसेवा
लोणंद – येथील एसटी स्थानकावर झालेल्या गर्दीचा फायदा घेत, गांधीनगर (कोल्हापूर) येथील व्यापारी विनोद सुंदरदास चावला यांची 50 हजार रुपयांची रोकड लंपास झाल्याची घटना दि. 26 ऑगस्ट रोजी संध्याकाळी घडली. याप्रकरणी लोणंद पोलिसांनी तपास करून, अवघ्या तीन दिवसांत, संशयित तीन महिलांना अटक केली आहे. संशयितांकडून सर्व रोकड जप्त करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विनोद चावला हे लोणंद येथील व्यापार्यांकडून मालाचे पैसे वसूल करून, नीरा येथे जाण्यासाठी एसटी स्थानकात आले होते. तेथे दुपारी 4.30 च्या सुमारास ते बसमध्ये चढत असताना, त्यांनी पिशवीत ठेवलेली रोकड गर्दीचा फायदा घेत, चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत चावला यांनी लोणंद पोलीस ठाण्यात तात्काळ फिर्याद नोंदवली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, लोणंदचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने तपास गतिमान केला. सीसीटीव्ही कॅमेर्याचे फुटेज व माहितीच्या आधारे हा गुन्हा जामखेड (जि. अहमदनगर) येथील महिलांनी केल्याचे स्पष्ट झाले. या संशयित महिला लोणंद येथील इंदिरानगर भागात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांनी सापळा रचून, त्यांना अटक केली.
चिलकारू उमेश पवार (वय 30, मूळ रा. जामखेड), सविता राजू पवार (वय 40, रा. आरोळी वस्ती, जामखेड) व अंजली राकेश पवार (वय 35, मूळ रा. मिलिंदनगर, जामखेड) अशी संशयितांची नावे असून, त्यांच्याकडून 50 हजार रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. पोलीस उपनिरीक्षक रोहित हेगडे, ज्योती चव्हाण, सहाय्यक फौजदार पिसाळ,अंकुश कोळेकर व अमोल जाधव यांनी ही कारवाई केली.





