Satara Crime | गाडी खरेदीचं आमिष..; आणि तब्बल 27 लाखांची फसवणूक!

प्रभात वृत्तसेवा
कराड – मलकापूर, ता. कराड येथील हॉटेल व्यावसायिक रासिक मोहम्मद मलबारी (रा. संगमनगर, मलकापूर) यांचा विश्वास संपादन करून, त्यांची कार विकत घेतो, असे सांगून राजस्थानमधील आठ जण आणि पंजाबमधील एकाने फसवणूक केली. कार आपल्या ताब्यात ठेवत, हॉटेलधील मुक्कामाचे बिल न देता, आपली 27 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार मलबारी यांनी दिली आहे. त्यानुसार नऊ जणांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सौरभ रमेशकुमार चावला, सलोनी सौरभ चावला, अजय लजपथ आर्या, लजपथ आर्या, वाय. चुनावध, करमजीत मलकित सिंग, मलकित सिंग, गौरव चावला, दीपक आर्या (रा. राजस्थान) आणि बलजीत गुरुचरण सिंग (पंजाब) अशी संशयितांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलकापूर येथे रासिक मलबारी यांच्या हॉटेलमध्ये संशयितांनी भाड्याने खोल्या घेतल्या होत्या.
यादरम्यान त्यांनी मलबारी यांचा विश्वास संपादन करून, त्यांची कार खरेदी करतो, असे सांगितले. त्यांच्या हॉटेलमध्ये अनेक दिवस मुक्काम केला. जेवणाचे बिल न देता आणि आरटीओ रजिस्ट्रेशन न करता, कार आपल्या ताब्यात ठेवून, संशयितांनी फसवणूक केल्याचे मलबारी यांनी या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी सपोनि अशोक भापकर तपास करत आहेत.





