Satara Crime | मंदिरातील चोरीचा उलगडा ; संशयिताकडून मूर्ती जप्त, गुन्हा उघड

प्रभात वृत्तसेवा
वडूज – येथील ज्योतिर्लिंग मंदिरातील पितळेची मूर्ती रविवारी (दि. 31 ऑगस्ट) चोरून नेणार्या दीपक शहाजी माने (वय 28) याला वडूज पोलिसांनी गुरुवारी (दि. 4) अटक केली आहे. हा गुन्हा पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत उघडकीस आणून, संशयिताकडून मूर्ती जप्त केली आहे.याबाबत माहिती अशी, वडूज-कराड रस्त्यावरील ज्योतिर्लिंग मंदिरातील पितळेची मूर्ती रविवारी (दि. 31 ऑगस्ट) चोरीस गेल्याची फिर्याद पुजारी दिलीप कृष्णा गोडसे यांनी वडूज पोलीस ठाण्यात दिली होती.
पोलिसांनी मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून, संशयिताची ओळख पटवली. संशयित दीपक माने हा गुरुवारी (दि. 4) वडूज बसस्थानक परिसरात आल्याची माहिती मिळाल्यावर हवालदार गणेश शिरकुळे, कुंडलिक कटरे, सागर बदडे, वाहतूक पोलीस कर्मचारी अजय भोसले, गजानन वाघमारे यांनी संशयितास ताब्यात घेतले.
त्याची कसून चौकशी केल्यावर ही मूर्ती आई जया माने यांच्याकडे ठेवल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी जया माने यांचा शोध सुरू केला. तया वडूज-दहिवडी रस्त्यावर असल्याचे समजल्याने, पोलिसांनी तेथे जाऊन, त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडी साहित्याची तपासणी करण्यात आल्यानंतर जुन्या कपड्यात ठेवलेली मूर्ती सापडली. रणधीर कर्चे तपास करत आहेत.





