Satara Crime | माण तालुक्यात दुसरा खून! पुळकोटीतील वृद्ध महिलेची हत्या ; हत्येचे कारण अजून अस्पष्ट

प्रभात वृत्तसेवा
दहिवडी – माण तालुका पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरला आहे. मार्डीतील खुनानंतर अवघ्या काही दिवसांतच पुळकोटी गावात एका वृद्ध महिलेची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पुळकोटी गावात शुक्रवारी दि. १२ सप्टेंबर रोजी दुपारी घडलेल्या या घटनेनंतर घटनास्थळावर मोठी गर्दी जमा झाली होती.
घटनेची माहिती कळताच ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. सौ. सुलभा मारुती गलंडे (वय 65) यांचा दुपारी 2.30 ते संध्याकाळी 6 या वेळेत अज्ञातने धारदार शस्त्राने कपाळावर, गळ्यावर आणि चेहऱ्यावर वार करून त्यांचा खून केला. इतकेच नव्हे तर खुनानंतर घटनास्थळी पडलेले रक्त पुसून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी मृत महिलेचा मुलगा डॉ. संदेश मारुती गलंडे (रा. वडूज) यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक रंजित सावंत यांनी रात्री उशिरा घटनास्थळाची पाहणी केली. दहिवडी पोलीस ठाण्याचे सपोनि दराडे यांनीही घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे यांच्याकडे तपास असून अज्ञात आरोपीचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, ठसे तज्ज्ञ व श्वान पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.





