Satara Crime | कोयत्याचा धाक दाखवून मंगळसूत्र हिसकावले ; मेडिकल कॉलेजसमोरील घटनेने खळबळ

प्रभात वृत्तसेवा
सातारा – रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून नेले जात असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. विलासपूर येथे झालेल्या प्रकरणानंतर ऐन गणेशोत्सवात कृष्णा नगर परिसरातील छत्रपती संभाजी महाराज वैद्यकीय महाविद्यालयाच्या समोर प्रतापसिंह नगरकडे जाणाऱ्या मार्गावर एका महिलेला दोघांनी कोयत्याचा धाक दाखवून दीड तोळ्याचे मंगळसूत्र लुबाडल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली आहे.
भयभीत झालेल्या महिलाने जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा करत पळ काढला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. या घटनेमुळे सातारा शहर पोलिसांसमोर पुन्हा एकदा आव्हान उभे राहिले आहेसातारा शहरातील प्रतापसिंह नगर रस्त्याला हार्मनी पार्क येथे ही धक्कादायक घटना घडली.
गुरुवारी पहाटे मॉर्निंग वॉक करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या महिलांना लक्ष करत दोन अज्ञात व्यक्ती दुचाकीवरून आले. मेडिकल कॉलेजच्या गेट समोरच सोनाली दीपक लोंढे या महिलेला कोयत्याचा धाक दाखवून गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्यात आले. तिच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे मंगळसूत्र हिसकावण्यात आले असून घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दुचाकीवरील दोघांनी तात्काळ तिथून पलायन केले. जीव वाचवण्याच्या भीतीने गेटवरून उडी मारून इतर महिलांनी त्यावेळी पळ काढला.
संशयितांचा शोध सुरू..
या घटनेचे वृत्त समाज माध्यमांवरून पसरताच या घटनेची गंभीर दखल पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी घेतली. त्यांच्या निर्देशाप्रमाणे सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला तात्काळ पाचारण केले व यासंदर्भात तातडीने तपासाच्या सूचना दिल्या. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे प्रतापसिंह नगरामध्ये सातारा शहर पोलिसांनी संबंधित संशयितांचा शोध सुरू केला आहे.





