Satara News | कायदा-सुव्यवस्थेसाठी साताऱ्यात मोठी कारवाई, गुन्हेगारांना हद्दपारीचे आदेश

प्रभात वृत्तसेवा
सातारा – गणेशोत्सव आणि शुक्रवारी (दि. 5) साजरा होणारा मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सातारा शहर आणि तालुक्यातील सराईत 142 गुन्हेगारांना हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी निर्गमित केले आहेत.प्रतिबंधात्मक कारवाईसाठी सातारा शहर व तालुका पोलीस ठाण्यांकडून सराईत गुन्हेगारांची यादी मागवण्यात आली होती.
शनिवार, दि. 6 पर्यंत गणेशोत्सव साजरा होत आहे. मुस्लिम बांधवांचा ईद-ए-मिलाद हा पवित्र सण शुक्रवारी (दि. 5) साजरा होत आहे. या सणाच्या काळात अवैध व्यवसाय करणार्या आणि गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या अट्टल गुन्हेगारांची यादी पोलिसांनी तयार केली होती. शहर आणि तालुक्यातील तब्बल 142 गुन्हेगारांना सातारा तालुक्यातून दि. 5 ते दि. 7 सप्टेंबर या कालावधीत हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिले आहेत.
सातारा शहरातील गुरुवार पेठ, शनिवार पेठ, सदरबझार, केसरकर पेठ, कोयना सोसायटी, लक्ष्मी टेकडी, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, मल्हार पेठ, आंबेडकर सोसायटी (रविवार पेठ), गोडोली, जगतापवाडी (शाहूनगर), इंदिरानगर झोपडपट्टी (विलासपूर), शहरालगतच्या कोडोली, खेड, प्रतापसिंहनगर, क्षेत्र माहुली, महागाव, धनगरवाडी, धनगरवाडी आणि तालुक्याच्या वेगवेगळ्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांना हद्दपारीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. संबंधित गुन्हेगारांचा शोध घेऊन, त्यांना हद्दपार करण्याच्या सूचना सातारा शहर व तालुका पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गस्त घालणारे बीट मार्शल व बीट अंमलदारांना देण्यात आल्या आहेत.





