Shirur News : शिरूरमध्ये केबल चोरीच्या घटनांनी शेतकरी हवालदिल; पोलिसांच्या निष्क्रियतेवर व्यक्त केला संताप

शिरूर : शिरूर तालुक्यातील बेट भागात मागील काही दिवसांपासून सातत्याने होणाऱ्या केबल आणि कृषीपंप चोरीच्या घटनांनी शेतकऱ्यांमध्ये चिंता आणि असंतोष निर्माण झाला आहे. मागील आठवड्यात काठापूर खुर्द येथील घोडनदीकाठावरील चोरीची घटना ताजी असतानाच रविवारी (दि. ३१) पहाटे चांडोह येथील सहा शेतकऱ्यांच्या सुमारे १,५०० फूट केबल्सची चोरी झाली. या घटनेत शेतकऱ्यांचे अंदाजे सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
चांडोह येथील बाळासाहेब भिकाजी विधाटे, दशरथ होनाजी जाधव, कुंडलिक दगडू भाकरे, दगडू नामदेव वळसे आणि धोंडिबा नामदेव वळसे या शेतकऱ्यांचे आठ ते नऊ कृषीपंपाच्या केबल्स अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या. या महिन्यातील ही चौथी घटना असून, शरदवाडी, जांबुत, काठापूर खुर्द आणि फाकटे परिसरात गेल्या दोन महिन्यांत अशाच प्रकारच्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. चांडोहचे पोलीस पाटील सुदर्शन भाकरे यांनी या घटनेची माहिती दिली.
शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी दाखल केल्या असूनही पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये पोलिसांच्या कार्यशैलीबाबत तीव्र नाराजी आहे. गेल्या काही काळात शेतकऱ्यांशी संबंधित चोरीच्या घटनांबाबत पोलिसांना माहिती देऊनही आणि प्रसारमाध्यमांतून बातम्या प्रसिद्ध होऊनही कारवाईचा अभाव आहे. दर आठ ते दहा दिवसांनी अशा घटना घडत असल्याने गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक राहिलेला नाही, अशी चर्चा शेतकरी वर्गात आहे.शेतकरी आता प्रशासनाकडून तातडीने कारवाईची मागणी करत आहेत. चोरट्यांचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी त्यांची अपेक्षा आहे.





