Satara Crime: साताऱ्यात ६.३५ कोटींचा गंडा! पंजाबमधून मागवली २६ मशिन्स, पण…पंजाबमधील ३ जणांवर गुन्हा
Satara Crime: पैसे उकळून खराब मशिन्स पाठवल्या फोन केले बंद; पंजाबमधील 'सिनिअर मशिनरी' कंपनीच्या संचालकांवर सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा.

Satara Crime – उद्योगासाठी आवश्यक 26 मशिनरी खरेदी करण्यासाठी तब्बल 6 कोटी 35 लाख 7 हजार 600 रुपये आरटीजीएसद्वारे अदा करूनही प्रत्यक्षात खराब मशिनरी पाठवून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पंजाबमधील तिघांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पल्लवी मनोज शेंडे (वय 36, रा. करंजे पेठ, सातारा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
त्यांची ‘श्री. वरद विनायक एंटरप्रायझेस’ ही कंपनी असून, पुष्ठा तयार करण्यासाठी आवश्यक कच्चा माल तयार करण्याच्या प्रक्रियेसाठी संबंधित मशिनरी खरेदी करण्यात आली होती. फिर्यादीनुसार, अमृतसर येथील एम/एस सिनिअर मशिनरी मॅन्युफॅक्चरिंग कंपनीकडून 26 मशिनरी घेण्याचा व्यवहार झाला. त्यासाठी तब्बल 6 कोटी 35 लाख 7 हजार 600 रुपये आरटीजीएसद्वारे देण्यात आले.
मात्र, कंपनीकडून प्रत्यक्षात दाखविण्यात आलेल्या मशिनरीऐवजी खराब मशिनरी पाठविण्यात आल्याचा आरोप आहे. याबाबत संबंधितांना वारंवार संपर्क साधूनही फोन न उचलणे, तसेच मशिनरी दुरुस्त करून देण्याचे आणि नवीन मशिनरी पाठविण्याचे आश्वासन देत वेळकाढूपणा केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
आजपर्यंत मशिनरी दुरुस्त करून देण्यात आली नाही किंवा नवीन मशिनरीही पाठविण्यात आली नसल्याने फसवणूक झाल्याचे शेंडे यांनी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी मुख्तारसिंग थिंड, अमरदीपसिंग ऊर्फ दिपू मुख्तारसिंग थिंड आणि अविनाश ऊर्फ आशु मुख्तारसिंग थिंड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक काटकर तपास करीत आहेत.




