Girish Mahajan Relative Arrested : गिरीश महाजन यांच्या नातेवाईकाला अटक; कुंभमेळ्याच्या कामांशी संबंधित एकाची २.१७ कोटींची फसवणूक
कुंभमेळ्याच्या कामासाठी हाऊसकीपिंगचे कंत्राट मिळवून देण्याच्या बहाण्याने त्यांनी एका व्यक्तीची २.१७ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

Girish Mahajan Relative Arrested – नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या कामांशी संबंधित फायदेशीर कंत्राटे मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची २.१७ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या एका नातेवाईकाचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या गोघांची तनय महाजन (३२) आणि नरेंद्र तोताराम महाजन (५१) अशी पटली आहे.
महाजन यांनी कबूल केले की, आरोपी हा त्यांचा दूरचा नातेवाईक असला तरी तो गॉन केस (सुधारण्याची शक्यता नसलेली व्यक्ती) आहे आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी त्यांनी केली.
कुंभमेळ्यासाठीच्या बनावट वर्क ऑर्डर्सशी संबंधित ३०५ कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी ही अटक केली. कुंभमेळ्याच्या कामासाठी हाऊसकीपिंगचे कंत्राट मिळवून देण्याच्या बहाण्याने त्यांनी एका व्यक्तीची २.१७ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
आरोपी आणि त्यांच्या साथीदाराने तक्रारदाराचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याला एक बनावट वर्क ऑर्डर दाखवली होती. या कागदपत्रावर भारत सरकारचे बोधचिन्ह आणि नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणचे नाव होते. तनय हा त्यांचा दूरचा नातेवाईक आहे आणि त्याच्याविरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल झाले आहेत, असे महाजन यांनी कबूल केले.
मी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याशी बोललो आणि या गुन्ह्यात तीन-चार नावे समोर आली होती. मला वाटते की यात सहा ते सात जण सामील होते आणि त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे महाजन म्हणाले.





