Riddhi Thakkar Death : भीषण अपघातात दुर्दैवी अंत; मुंबईतील 24 वर्षीय बायक रायडर तरुणीसोबत नेमकं काय घडलं?
Riddhi Thakkar Death : रिद्धी ठक्कर यांच्या नेतृत्वाखाली देशातील विविध भागांतील २३ महिला बायकर्सचा एक गट रायपूरहून बस्तरकडे प्रवासासाठी निघाला होता.

Riddhi Thakkar Death : मुंबईतील तरुणीचा छत्तीसगड राज्यात अपघाती मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. अपघातात मृत्यू झालेल्या २४ वर्षीय तरुणीचे नाव रिद्धी ठक्कर आहे. ही तरुणी मुंबईच्या बोरिवली पश्चिम येथील रहिवासी होती.
रिद्धी ठक्कर हिच्या नेतृत्वाखाली देशातील विविध भागांतील २३ महिला बायकर्सचा एक गट रायपूरहून बस्तरकडे प्रवासासाठी निघाला होता. या ताफ्यात २० बाईक आणि एक चारचाकी वाहन सहभागी होते. प्रवास सुरू होण्याच्या अवघ्या १५ तासांपूर्वी रिद्धी यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्टही शेअर केली होती.
मात्र, काल सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या दरम्यान जगतरा दरीतील एका वळणावर अज्ञात ट्रकने तिच्या बाईकला जोरदार धडक दिली. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला. गंभीर जखमी झालेल्या रिद्धीला त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
View this post on Instagram
मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातील मार्काटोला घाटाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३० वर अपघात घडला. रिद्धीच्या अपघाती मृत्यृमुळे तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्या राहत असलेल्या परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
कोण होती रिद्धी ठक्कर?
रिद्धीला बाइकिंग आणि लांब पल्ल्याच्या राइड्सची विशेष आवड होती. ती आपल्या प्रवासाशी संबंधित फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असे. तिच्या अचानक झालेल्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर बाईकिंग कम्युनिटीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघाताबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू असल्याचे वृत्त आहे. नेमकी ही घटना कशी घडली याची माहिती देखील पोलीस घेत आहेत.





