शेअर बाजार घोटाळा; माधवी पुरी बुच यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा?

मुंबई : सेबीच्या माजी अध्यक्षा माधवी पुरी बुच यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागण्याची चिन्हे आहेत. त्यांच्या विरोधात कथित शेअर बाजार घोटाळ्याबद्दल गुन्हा दाखल करण्याचा आदेश विशेष न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) दिला. पेशाने पत्रकार असणाऱ्या सपन श्रीवास्तव (वय ४७) यांनी बुच आणि इतरांविरोधात आर्थिक फसवणूक, भ्रष्टाचार आणि नियामक उल्लंघनांचा आरोप करणारी तक्रार दाखल केली. तसेच, तपासाची मागणी केली.
संबंधित तक्रारीची दखल घेऊन विशेष एसीबी न्यायालयाने बुच यांच्यासह ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा महत्वपूर्ण आदेश दिला. नियामक त्रुटींचा आणि संगनमताचा प्रथमदर्शनी पुरावा असल्याचे आढळते. त्यामुळे संबंधित प्रकरणी न्याय्य आणि निष्पक्ष चौकशीची गरज आहे, असे न्यायालयाने शनिवारी दिलेल्या निकालात नमूद केले. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा आणि सेबीच्या निष्क्रियतेमुळे न्यायालयीन हस्तक्षेप आवश्यक बनला. संबंधित प्रकरणाच्या चौकशीवर आम्ही देखरेख ठेऊ, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच, ३० दिवसांत चौकशीचा अहवाल मागवला.




