Cyber fraud : सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ नागरिक टार्गेट ; सतर्कतेचे सायबर पोलिसांकडून सतर्कतेचे आवाहन

प्रभात वृत्तसेवा
पुणे – शेअर बाजारात गुंतवणुकीवर जास्त परताव्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी पुण्यातील अनेक नागरिकांची तब्बल करोडो रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. विविध भागांत घडलेल्या या घटनांमध्ये चोरट्यांविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, तपास गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस करीत आहेत. शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी अनोळखी लिंक, ॲप किंवा व्यक्तींवर विश्वास ठेवू नका.
कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी संबंधित कंपनी अथवा अॅपची वैधता तपासावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.ज्येष्ठाची ७५ लाखांची फसवणूक : एक ५६ वर्षीय तक्रारदार हे बिबवेवाडीत राहतात. त्यांच्या मोबाइलवर शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी लिंक पाठवून चोरट्यांनी त्यांना एका ॲपच्या माध्यमातून विविध योजना दाखवल्या. चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून तक्रारदारांनी वेळोवेळी ७५ लाख २० हजार रुपये जमा केले. परंतु, परतावा न मिळाल्याने त्यांनी चौकशी केली असता, संबंधितांचे मोबाइल क्रमांक बंद असल्याचे समोर आले.
अखेरीस त्यांनी शिवाजीनगर सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलीस निरीक्षक संगीता देवकाते तपास करीत आहेत. सिंहगड रस्ता परिसरातील ६६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइलवर १५ जुलैला गुंतवणुकीबाबत संदेश आला होता. चोरट्यांनी उच्च परतावा देण्याचे आमिष दाखवून ३३ लाख १९ हजार रुपये मिळवले.
परतावा न मिळाल्याने ज्येष्ठ नागरिकाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस निरीक्षक उल्हास कदम तपास करीत आहेत.बाणेर भागातील एका व्यक्तीचीही अशाच प्रकारे ११ लाख ८ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. बाणेर पोलिसांत गुन्हा दाखल असून पोलीस निरीक्षक सरग तपास कारीत आहेत.
उपनगरीय भागांतही घटना…
वाघोलीत एका तरुणाची २४ लाख ८१ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे करीत आहेत. बिबवेवाडीत एका ४१ वर्षीय महिलेची १० लाख ८९ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याचा तपास पोलीस निरीक्षक सूरज बेंद्रे करीत आहेत. तर कोंढव्यात एका तरुणाची १० लाख ९८ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.
याचा तपास पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप करीत आहेत.दरम्यान, कात्रजमधील एका व्यावसायिकाला आरटीओच्या नावाने पाठवलेल्या बनावट चलन फाइलमुळे २ लाख ५५ हजारांचा फटका बसला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे करत आहेत.





