#SarfrazKhan । डॉन ब्रॅडमनशी होत असलेल्या तुलनेवर स्वतः सरफराज खानची मोठी प्रतिक्रिया

Sarfraz Khan – भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचा युवा फलंदाज सर्फराज खानच्या नावाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. त्याने मागील तीन वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धावा फाटकावल्या आहेत. सरफराज खानने गेल्या तीन रणजी ट्रॉफी हंगामात केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी त्याचे नाव सातत्याने घेतले जात आहे. नुकतीच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची निवड झाली आहे. मात्र यावेळीही सरफराजला संघात संधी मिळाली नाही. भारतीय संघात निवड होत नाही म्हणून खचून न जाता त्याने आपल्या कामगिरीत सातत्य सोडलेले नाही. दिल्लीविरुद्ध नुकत्याच झालेल्या रणजी सामन्यात सरफराज खानने शानदार शतक झळकावले आहे.
#INDvsNZ । शाब्बास…! शुभमन गिलचे सलग दुसरे एकदिवसीय शतक; भारताचा स्कोर…
सरफराज खानची दमदार कामगिरी पाहता क्रिकेटमधील महान फलंदाज डॉन ब्रॅडमन यांच्याशी त्याची तुलना केली जात आहे. ब्रॅडमनदेखील देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धावा करायचा. सरफराज खानदेखील सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये जबरदस्त सरासरीने धावा करत आहे. त्यामुळे ब्रॅडमनशी होत असलेल्या तुलनेवर सरफराज म्हणाला की, “या तुलनेने मला आनंद होतो की मी गेल्या तीन मोसमात त्यांच्या (ब्रॅडमनच्या) विक्रमाच्या अगदी जवळ आहे. मात्र अशी परिस्थिती नेहमीच सारखी राहणार नाही. सध्या मी त्यांच्या कामगिरीच्या अवती-भोवती असण्यात मला आनंद आहे.” सरफराज खानने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ८० पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या तर डॉन ब्रॅडमनने ९५ पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या होत्या. त्यामुळेच सरफराजची तुलना ब्रॅडमनशी केली जात आहे.
कामगिरीचे वडिलांना दिले श्रेय
सरफराज खान त्याच्या वडिलांबद्दल बोलताना म्हणाला की, “माझे वडील काही दिवसांपूर्वी दिल्लीत आले होते. त्यावेळी मी त्यांच्यासोबत गाझियाबादमध्ये सामन्यापूर्वी दोन दिवस फलंदाजीचा सराव केला होता. भारतीय संघात निवड न झाल्याने मी नाराज आहे हे त्यांना माहीत होते. त्यामुळे ते मला म्हणाले, कोणत्याही संघासाठी सतत धावा करत राहणे हे आपले काम आहे. मी लहान असल्यापासून जेव्हा जेव्हा थोडा गोंधळलेला असतो किंवा गोष्टी बरोबर नसतात तेव्हा माझे बाबा मला प्रेरित करतात, मला आत्मविश्वास देतात आणि मला मानसिकरित्या आव्हानांसाठी तयार करतात.’





