Don Bradman’s Letter : डॉन ब्रॅडमन यांनी ‘या’ 3 दिग्गज क्रिकेटपटूंबाबत वर्तवलेले भाकित ठरले खरे, 40 वर्षांनंतर पत्र आले समोर

Don Bradman’s Letter : क्रिकेट जगतातील सर्वात महान फलंदाज म्हणून ओळखले जाणाऱ्या सर डॉन ब्रॅडमन यांचे एक पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पत्रामध्ये त्यांनी तीन क्रिकेटपटूंबाबत भाकित वर्तवले होते. विशेष म्हणजे त्यांचे हे भाकित खरे ठरले असून, हे तिन्ही खेळाडूंची महान क्रिकेटपटूंमध्ये गणना होते. हे तीन खेळाडू म्हणजे स्टीव्ह वॉ, शेन वॉर्न आणि रिकी पॉन्टिंग हे आहेत.
सर डॉन ब्रॅडमन यांनी 90च्या दशकामध्ये त्यांचा मित्र पीटर ब्रॉ याला लिहिलेल्या पत्रात या तीन खेळाडूंचा उल्लेख केला आहे. आता 4 दशकांनंतर त्यांचे हे पत्र समोर आले आहे. डॉन ब्रॅडमन यांनी लिहिलेली 20 हून अधिक पत्रे ऑस्ट्रेलियातील नॅशनल लायब्ररीत सापडली आहेत. यातील पत्रांमध्ये स्टीव्ह वॉ, शेन वॉर्न आणि रिकी पॉन्टिंग हे तिन्ही खेळाडू भविष्यात मोठी कामगिरी करतील, असे भाकित वर्तवण्यात आले होते.
शेन वॉर्नची प्रशंसा करताना ब्रॅडमन यांनी लिहिले होते की, ‘वॉर्न खूपच शानदार गोलंदाजी करत असून, तो फलंदाजांसाठी समस्या निर्माण करत आहे. ‘ वॉर्नने त्यांचे शब्द पुढे जाऊन खरे ठरवले. आज वॉर्न जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक असून, सर्व सामन्यांमध्ये 1001 विकेट्स घेतल्या आहेत. त्याला ‘King of Spin’ म्हणूनही ओळखले जात असे.
स्टीव्ह वॉ बाबत त्यांनी लिहिले होते की, ‘त्याच्यामध्ये एक चांगला फलंदाज होण्याचे सर्व गुण आहेत.’ वॉ ऑस्ट्रेलियाच्या सर्वात महान क्रिकेटपटूंपैकी एक असून, त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाच्या संघाने अनेक स्पर्धांमध्ये विजय मिळवला आहे. पॉन्टिंगबाबत बोलतानाही अशाच प्रकारचे भाकित त्यांनी वर्तवले होते. पुढे जाऊन पॉन्टिंगने त्यांचे हे भाकित खरे ठरवले. आज या तिन्ही खेळाडूंचा ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये समावेश होतो.





