IND vs ENG : यशस्वी जैस्वालला एजबॅस्टनमध्ये इतिहास करण्याची संधी, फक्त ‘एवढेच’ करावे लागेल काम

Yashasvi Jaiswal Eyes Bradman Record : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना एजबॅस्टनच्या मैदानावर खेळला जाणार आहे. यजमान इंग्लंडने पहिला सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे, तर भारतीय संघाला पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला मालिकेत पुनरागमन करायचे असेल, तर दुसऱ्या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे. या सामन्यात सलामीवीर यशस्वी जैस्वालला इतिहास रचण्याची संधी आहे.
इंग्लंडविरुद्ध जैस्वालला इतिहास रचण्याची संधी –
मालिकेतील दुसरा सामना २ जुलैपासून सुरु होणार आहे. या सामन्यात यशस्वी जैस्वालची बॅट तळपली, तर तो महान खेळाडू डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम मोडून एक नवा महाविक्रम आपल्या नावावर करू शकतो. आतापर्यंत इंग्लंडविरुद्ध असा पराक्रम केवळ ब्रॅडमन यांनाच करता आला आहे. यशस्वी जैस्वालने आपल्या कारकिर्दीत सर्वाधिक कसोटी सामने इंग्लंडविरुद्ध खेळले आहेत आणि त्याचा या संघाविरुद्धचा रेकॉर्डही अप्रतिम आहे.
– A Test hundred in West Indies in his first Test.
– A Test hundred in Australia in his first Test.
– A Test hundred in England in his first Test.YASHASVI JAISWAL – THE GENERATIONAL TALENT. 🥶🇮🇳 pic.twitter.com/Be1cEWNS3b
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 20, 2025
आतापर्यंत त्याने इंग्लंडविरुद्ध ६ कसोटी सामन्यांमधील ११ डावांत ८१७ धावा केल्या आहेत. यावेळी त्याची सरासरी ८१.७० अशी आहे आणि त्याने ३ शतकेही झळकावली आहेत. जर या सामन्यात जैस्वाल १८३ धावा करण्यात यशस्वी झाला, तर तो इंग्लंडविरुद्ध जलद १,००० धावा पूर्ण करेल. आतापर्यंत हा पराक्रम फक्त डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर आहे, ज्यांनी १३ डावांत इंग्लंडविरुद्ध १,००० धावा पूर्ण केल्या होत्या.
यशस्वी जैस्वाल उत्तम फॉर्ममध्ये –
यशस्वी जैस्वाल हा २०२४ मध्ये टीम इंडियासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने १५ सामन्यांच्या २९ डावात ५४.७४ च्या सरासरीने १४७८ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ३ शतके आणि ९ अर्धशतके केली आहेत. त्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या नवीन चक्राची सुरुवातही उत्तम पद्धतीने केली आहे आणि इंग्लंडच्या भूमीवर पहिल्याच डावात शतक झळकावले आहे. तथापि, दुसऱ्या डावात तो काही खास करु शकला नाही आणि टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला.
हेही वाचा – IND vs ENG : ‘बुमराहवर जास्त अवलंबून राहू नका, कुलदीपला खेळवा!’ माजी भारतीय खेळाडूचा सल्ला
टीम इंडियाला मालिकेत बरोबरी साधण्याची संधी –
जर टीम इंडिया एजबॅस्टनमध्ये जिंकली तर मालिका १-१ अशी बरोबरीत येईल. या विजयासह मालिकेतील उत्साहही द्विगुणीत होईल. टीम इंडियाने इंग्लंडमध्ये २००७ मध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली शेवटची मालिका जिंकली होती. जर टीम इंडिया गिलच्या नेतृत्वाखाली द्रविडच्या कामगिरीची पुनरावृत्ती करू शकली तर कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाच्या उज्ज्वल भविष्याकडे हे पहिले पाऊल असेल.





