Santosh Pandit : संतोष पंडितला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; वादग्रस्त रीलसाठी वापरलेला आयफोन, सीमकार्ड व ट्रायपॉड जप्त
Santosh Pandit : वादग्रस्त रीलप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संतोष पंडितला पुणे न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. पोलिसांनी आयफोन, सीमकार्ड आणि ट्रायपॉड जप्त केला.

Santosh Pandit : उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि एका महिला नगरसेविकेबाबत समाजमाध्यमातील रीलमध्ये आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अटक आरोपी संतोष पंडितला पुणे न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. पंडितने वादग्रस्त रील करताना वापरलेला आयफोन, त्यातील सीमकार्ड आणि ट्रायपॉड स्टँड कोथरूड पोलिसांनी जप्त केला आहे.
या प्रकरणी संतोष गजानन पंडित (वय ४८, रा. नारायण पेठ) याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ७५ (१) (४), ७५ (३), ३५६ (२), ३५२ सह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत ३६ वर्षीय महिलेने कोथरूड पोलिसात तक्रार दिली आहे. संतोष पंडितने महिलांचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने लैंगिक शेरेबाजी करणारी चित्रफीत समाजमाध्यमात टाकली; तसेच घटनात्मक पदावरील मंत्र्यांबाबत आक्षेपार्ह व अवमानकारक शब्द वापरून त्यांची बदनामी केली आणि समाजात अशांतता पसरवण्याच्या उद्देशाने धमक्या दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या गुन्ह्यात पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आरोपी पंडितला न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांच्या नोंदीवर असलेल्या या आरोपीविरोधात पर्वती पोलीस ठाण्यात दोन, डेक्कन आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यांत महिलांचा विनयभंग, बदनामी आणि अवमानकारक चित्रफिती प्रकरणी गुन्हे दाखल आहेत.
या गुन्ह्याच्या तपासादरम्यान महिला साक्षीदारांकडे चौकशी केली जात असून, आरोपी त्यांच्यावर दबाव टाकून समाजमाध्यमातून बदनामी करण्याची शक्यता आहे. आरोपीविरोधात पुरावे संकलित करून न्यायालयात आरोपपत्र सादर करायचे आहे.
त्यासाठी आरोपीला न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील योगेश कदम यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली. वरिष्ठ निरीक्षक अरुण घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने तपास करत आहेत.





