Pimpari : लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

श्रीक्षेत्र देहूगाव: लाखो वारकरी बंधू भगिनींच्या उपस्थितीत अन् वरूणराजाच्या साक्षीने जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचे श्रीक्षेत्र देहू येथून तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने बुधवारी (दि. १८ जून) प्रस्थान झाले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दिंडी क्रमांक २८ मधील शिवाजी नारायण शिंदे व माऊली महाराज कदम या वारकऱ्यांच्या हस्ते पादुका पूजन संपन्न झाले. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी महापूजा करून आरती केली, त्याचवेळी वरुणराजाने जलाभिषेकाला सुरवात केली. अखेर दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास तुकोबांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान केले.
विविध क्षेत्रातील मान्यवर, वारकऱ्यांचा मेळा या गर्दीमुळे इंच इंच वेगानेच पालखी पुढे सरकावत होती. पावसामुळे व्यत्यय न येता या सुखसोहळ्याच्या आनंदात भरच पडली. वारकऱ्यांनी भर पावसात नाचत-गात विठुनामाचा गजर केला. तुकोबांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांची गर्दी ओसंडून वाहत होती. अखेर सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पालखी येथील पहिल्या मुक्कामासाठी इनामदार वाड्यात विसावली.
वारकऱ्यांचा टाळ मृदंगाचा निनाद, विना, तुतारी, टाळ, चिपळ्यांच्या तालावर मंत्रमुग्ध झालेले वारकरी ‘ज्ञानोबा-तुकाराम’ नामाचा अखंड जयघोषाने सारा आसमंत दुमदुमला होता. सर्वधर्मसमभावाची आणि त्यागाचे प्रतिक असलेली भगवी पताका खांद्यावर घेऊन सामाजिक एकतेचे दर्शन या सोहळ्यातून घडले. या ठिकाणी भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली.
“तुका म्हणे ऐसे अर्त ज्याचे मनी, त्याची चक्रपाणी वाट पाहे” या अभंगाप्रमाणे लाखो वारकरी आपल्या विठूरायाच्या दर्शनासाठी आतुरलेले होते. बुधवारी पालखीचे प्रस्थान असल्याने येथील मुख्य मंदिर, वैकुंठ गमन मंदिर परिसरातील इंद्रायणी काठ सकाळपासूनच वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेला होता. उपस्थित वारकरी विठ्ठल भक्तीचा हा सोहळा आपल्या डोळ्यात साठवित होते. मुखी हरी नामाचा जयघोष होता, कशाचीही पर्वा न करता पावसाचा सरी कोसळत असताना देखील पावले टाकत आपली प्रदक्षिणा घालत होते.
विविध धार्मिक कार्यक्रमाने दिवसाची सुरूवात
पहाटे साडेचार वाजता संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख दिलीप महाराज मोरे, विश्वस्त विक्रमसिंह महाराज मोरे, गणेश महाराज मोरे व वैभव महाराज मोरे यांच्या हस्ते काकडआरती करण्यात आली. पाच वाजता श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिरातील तुकोबाराच्या मूर्तीची महापूजा संपन्न झाली. पहाटे साडेपाच वाजता तपोनिधी नारायण महाराज मंदिरातील महापूजा झाली. सकाळी नऊ वाजता येथील घोडेकर सराफ यांच्याकडून श्री संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांना चकाकी देण्यात आली. सकाळी १० ते १२ या वेळेत हभप पुंडलिक महाराज मोरे देहूकर यांचे पालखी सोहळ्याच्या काल्याचे कीर्तन झाले.
कोल्हापूर संस्थानकडून मानाचे जरीपटके
दहाच्या सुमारास तुकाराम महाराजांच्या पादुका घोडेकर सराफांकडून पालखी रथा पुढील पहिली मानाची सर्वात जुनी म्हातरबाबा पाथरुडकर दिंडीने गंगा म्हसलेकर या सेवेकऱ्यांनी डोक्यावर इनामदार वाड्यात आणल्या. पादुकांची परंपरागत विधीवत पूजा दिलीप महाराज मोरे गोसावी यांनी केली. या पादुका पालखीचे मानकरी गंगा म्हसलेकर मंडळींच्या ताब्यात देण्यात आल्या. त्यांनी ह्या पादुका डोक्यावर घेऊन टाळ-मृदंग आणि तुतारी या वाद्यांसह सकाळी ११ वाजता मुख्यमंदिरात भजनीमंडपात आणल्या. तत्पूर्वी कोल्हापूर संस्थान शाहू महाराजांकडून मानाचे दोन जरीपटके मंदिरात आणण्यात आले. प्रदक्षिणा घालून हे जरिपटके संस्थानकडे सुपुर्त करण्यात आले.
इनामदार वाड्यात पहिला मुक्काम
महापूजेनंतर पालखीच्या प्रस्थान कार्यक्रमाला सुरवात झाली. चोपदार नामदेव निवृत्ती गिराम, कानसुलकर, खांदेकरी गुंडाप्पा कांबळे, तानाजी कळमकर या मानकऱ्यांना सेवेकरी मंडळींचा देवस्थानच्या वतीने नारळप्रसाद देऊन सत्कार करण्यात आला. परंपरेनुसार महाराजांच्या पादुका उपस्थितांच्या हस्ते फुलांनी सजवलेल्या पालखीत ठेवण्यात आल्या. त्यानंतर पालखी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास भजनी मंडपातून प्रदक्षिणेसाठी बाहेर पडली. प्रदक्षिणेनंतर पालखी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास इनामदार वाड्यात पहिल्या मुक्कामासाठी विसावली. रात्री परंपरेप्रमाणे म्हातरबाबा पाथरुडकर यांचे कीर्तन झाले.





