Pune : पालखी प्रस्थानानिमीत्त वाहतुकीत बदल

पुणे – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा रविवारी (२२ जून) श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. यामुळे रविवारी मध्यरात्री दोननंतर नाना-भवानी पेठेतील वाहतुकीत बदल केला आहे. पालखी सोहळा पुणे-सोलापूर महामार्गावर आल्यानंतर सोलापूर रस्ता वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे.
रविवार पहाटेपासूनच हे बदल होत असल्याने नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिर येथून प्रस्थान ठेवणार आहे. श्री तुकाराम महाराज यांची पालखी नाना पेठेतील श्री निवंडुग्या विठोबा मंदिर येथून प्रस्थान ठेवणार आहे.
दोन्ही पालख्या नाना-भवानी पेठेतून लष्कर भागात आल्यावर तेथून पुणे-सोलापूर महामार्गाने हडपसर गाडीतळपर्यंत एकत्रित जाणार आहेत. गाडीतळ येथून सासवड रस्त्याने दिवे घाटमार्गे श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी सासवड येथे रविवारी सायंकाळी मुक्कामी पोहोचणार आहे.
श्री तुकाराम महाराज पालखी यांची हडपसर गाडीतळमार्गे पुणे-सोलापूर महामार्गावरुन लोणी काळभोर येथे मुक्कामी येईल. मध्यरात्री दोननंतर टप्याटप्याने पालखी मार्ग वाहतुकीस बंद होणार असून पालखी मार्गस्थ झाल्यावर वाहतूक पूर्ववत येईल.
वाहतुकीस बंद असणारे रस्ते :
संत कबीर चौक ते बेलबाग चौक, संत कबीर चौक ते रामोशी गेट चौक, ढोले पाटील चौक (सेव्हन लव्हज चौक) ते रामोशी गेट चौक, गोळीबार मैदान चौक ते ढोले पाटील चौक, मम्मादेवी चौक ते गोळीबार मैदान, बिशप स्कूल ते मम्मादेवी चाैक, वानवडी बाजार ते मम्मादेवी चौक, ट्रायलक हाॅटेल ते महात्मा गांधी रस्ता ते रामोशी गेट चौक.
मोर ओढा ते भैरोबा नाला चौक, भैरोबा नाला चौक ते मम्मादेवी चौक, जांभुळकर चौक ते फातिमानगर चौक, सोलापूर रस्त्यावरील बी. टी. कवडे रस्ता चौक, काळूबाई मंदिर चौक, राम टेकडी, वैदुवाडी चौक, मगरपट्टा चौक, हडपसर गाव वेस (वाहतूक बंद मध्यरात्री दोन ते दुपारी दोन)
सीरम चौक ते सोलापूर रस्ता, १५ नंबर फाटा ते सोलापूर रस्ता, मंतरवाडी फाटा ते सासवड, खडी मशीन चौक ते बोपदेव घाट (वाहतूक बंद पहाटे पाच ते रात्री बारापर्यंत )





