Pune: वारकऱ्यांनी घेतला मेट्रो प्रवासाचा अनुभव

पुणे – पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागात बहुतांश भागात वारीमुळे बरेच महत्त्वाचे रस्ते वाहतुकीसाठी बंद होते. त्याचा थेट फायदा पुणे मेट्रोला झाल्याचे दिसते. पहिल्यांदाच पुणे मेट्रोची दैनंंदिन प्रवासी संख्या तीन लाखांपार गेली. शनिवारी अनेक हौसी वारकऱ्यांनी मेट्रो प्रवासाचा अनुभव घेतला. त्यामुळे शनिवारच्या दैनंदिन प्रवासी संख्येत देखील मोठी वाढ होणार असल्याचे दिसते.
संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या मुक्कामी होत्या. यामुळे शहरातील अनेक ठिकाणी वाहतुकीवर निर्बंध लादले होते. पेठांचा बहुतांश भाग खासगी वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद होता. तसेच पिंपरी-चिंचवड आणि पुण्याला जोडणाऱ्या मार्गांवर देखील निर्बंध लादले होते, अशावेळी नागरिकांनी मेट्रो प्रवासाला पसंती दिल्याचे दिसून आले. याशिवाय शहरात मेट्रो सुरू असल्याने अनेक वारकऱ्यांनी मेट्रो प्रवासाचा आनंद घेतला. शहरालगत राहणाऱ्या नातेवाइकांकडे जाण्यासाठीही वारकऱ्यांनी मेट्रोला पसंती दिली.
दुप्पट प्रवासी संख्या…
पहिल्यांदाच मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या ३,१९,०६६ पर्यंत पोहचली. यात १,५०,३८५ प्रवाशांनी चिंचवड ते स्वारगेट मार्गिकेवर प्रवास केला तर वनाज ते रामवाडी १,६८,६८१ प्रवाशांनी प्रवास केला. हे दोन्ही आकडे संबंधित मार्गिकेच्या सरासरी दैनंदिन प्रवासी संख्येच्या दुप्पट आहेत. शनिवारीच्या प्रवासी संख्येतही वाढ झाली. पेठेपासून जवळ असलेल्या मनपा स्थानकावर अनेक वारकरी मेट्रोच्या स्थानकावर आश्चर्याने फिरताना आणि टिकीट काढताना दिसले.
‘मी कधीही यापूर्वी मेट्रोने प्रवास केला नव्हता. त्यामुळे मेट्रो नक्की कशी असते हे पाहण्यासाठी आणि मेट्रो प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी मी इथे आलो. मेट्रोचा प्रवास वेगळा अनुभव होता.’ – श्रीराम शिंदे, वारकरी, बिड.
‘मला कुठे जायचे नव्हतं पण मेट्रो कशी असते ते पाहण्यासाठी मी रामवाडीपर्यंतच टिकीट काढले. इथे मेट्रोचा झगमगाट, एसीची हवा आणि बाकी सगळं पाहून छान वाटले.’ – राजाराम पवार, वारकरी, वाशिम.





