दोन्ही पालख्यांचे पुण्यात आगमन

पुणे – आषाढी एकादशीचा सोहळा संपवून संतांच्या पालख्यांची परतवारी सुरू झाली आहे. ज्या मार्गाने पालख्या पंढरपुरी जातात, त्याच मार्गाने त्या परत येतात. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी शुक्रवारी पहाटे पाच वाजता भवानीपेठेतील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामी आली तर जगद्गुरू तुकाराम महाराज यांची पालखी नवी पेठेतील विठ्ठल मंदिरात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमाराला मुक्कामी आली.
माऊलींची पालखी मंदिरात आल्यानंतर भवानी पेठ पालखी विठोबा मंदिरातील विश्वस्त मंडळाचे तेजेंद्र कोंढरे, प्रमोद बेंगरूट, गोरख भिकुले या विश्वस्तांनी पालखीचे स्वागत केले. प्रथेप्रमाणे समाज आरती करण्यात आली. शहरातील विविध समाजाच्या भाविकांनी मिळून केलेल्या आरतीला समाज आरती म्हणतात. माऊलींचे आगमन झाल्या झाल्या ही आरती भाविक करतात. त्यानंतर सहा वाजता काकड आरती करण्यात आली. त्यानंतर माऊलींच्या पादुकांना अभिषेक आणि पूजा करण्यात आली.
दिवसभर मंदिरात विविध दिंड्यांनी कीर्तनसेवा केली. तिथीचा क्षय असल्याने माऊलींचा मुक्काम पुण्यात दोन दिवस असणार आहे. रविवारी सकाळी काकड आरती, अभिषेक आणि पूजा होऊन पालखी आळंदीकडे मार्गस्थ होईल.
संत तुकाराम महाराजांची पालखी सायंकाळी पाच वाजता विठ्ठल मंदिरात आल्यानंतर तेथेदही सव्वासहा वाजता समाज आरती करण्यात आली. सायंकाळी सहा वाजल्यापासून, कीर्तन, जागर करण्यात आले. नऊ ते साडेदहा दरम्यान शेजारती करण्यात आली. तुकाराम महाराजांची पालखीचा मुक्काम मात्र एकच रात्र असणार आहे. सकाळी सात वाजता पालखी आळंदीच्या दिशेने पूर्व नियोजनानुसार प्रस्थान करणार आहे.





