Sant Tukaram Maharaj Palkhi: ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या गजराने दुमदुमले यवत; संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे उत्साहात स्वागत
Sant Tukaram Maharaj Palkhi: थेऊर फाटा, कुंजीरवाडी आणि नायगाव चौकात वारकऱ्यांच्या अभूतपूर्व स्वागतानंतर पालखीचे यवतमध्ये आगमन.

Sant Tukaram Maharaj Palkhi – जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा लोणी काळभोर-कदमवाकवस्ती येथील ग्रामीण भागातील पहिला मुक्काम पूर्ण करून रविवारी (दि. 12) सकाळी आठ वाजता यवत (ता. दौंड) येथील पुढील मुक्कामासाठी भक्तिमय वातावरणात मार्गस्थ झाला. पहाटेपासूनच पालखी तळावर पूजा, महाअभिषेक, आरती आणि वारकर्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. विठ्ठलनामाच्या अखंड गजरात ग्रामस्थांनी भावपूर्ण निरोप देत पालखीला पुढील प्रवासासाठी रवाना केले.
शनिवारी सायंकाळी लोणी काळभोर-कदमवाकवस्ती येथे मुक्कामी दाखल झालेल्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी निवास, भोजन, पिण्याचे पाणी व इतर आवश्यक सुविधांची उत्कृष्ट व्यवस्था केली होती. रविवारी सकाळी कदमवाकवस्ती पालखी तळावर साडेसातच्या सुमारास पूजा, महाअभिषेक आणि आरती पार पडली. त्यानंतर वारकर्यांनी बारस सोडून सकाळी आठच्या सुमारास पालखीने पुढील प्रवास सुरू केला.
लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत प्रवेश करताच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर, सरपंच नागेश काळभोर, पंचायत समितीचे माजी उपसभापती युगंधर काळभोर, माजी सरपंच माधुरी काळभोर, भरत काळभोर, योगेश काळभोर, राहुल काळभोर तसेच अंबरनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष हेमंत गायकवाड आणि सहकार्यांनी पालखीचे स्वागत केले. पाषाणकर बाग मार्गे विठ्ठल-रुक्मिणी मंदिराजवळ पालखी पोहोचल्यानंतर सार्वजनिक आरती आणि पूजन करण्यात आले.
’पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. पालखीच्या दर्शनासाठी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी मोठी गर्दी केली होती. फुलांनी सजविलेल्या पालखीचे दर्शन घेत अनेकांनी छायाचित्रे आणि सेल्फी काढत सोहळ्याचा आनंद लुटला. टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि हरिनामाच्या गजरात पालखीने सकाळी साडेआठच्या सुमारास लोणी काळभोरचा निरोप घेतला. याच टप्प्यापासून अपर तहसीलदार तृप्ती कोलते या पालखी सोहळ्यात सहभागी झाल्या.
थेऊर फाट्यावर पालखी पोहोचताच संदीप कुंजीर यांच्या वतीने तसेच हॉटेल एस फोर जी येथे वारकर्यांसाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली. श्रीनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेतर्फे नाश्ता आणि मोफत आरोग्यसेवा देण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संदीप धुमाळ, माजी सरपंच सचिन तुपे, सुनीता धुमाळ, व्यवस्थापक शिवाजी जावळे, गजानन सानप आणि सहकारी उपस्थित होते. कुंजीरवाडी येथे माजी पंचायत समिती सदस्य हिरामण काकडे यांनी पालखीचे स्वागत केले.
वारकर्यांना पोहे, चिवडा, पिण्याचे पाणी व नाश्त्याचे वाटप करण्यात आले. हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे व त्यांच्या सहकार्यांनीही सेवाकार्यात सहभाग घेतला. कुंजीरवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने प्रशासक सरपंच हरेश गोठे, पोलीस पाटील मिलिंद कुंजीर आणि ग्रामपंचायत सदस्यांनी पालखीचे स्वागत केले. नायगाव चौकात पालखी सोहळा दाखल होताच पुढील मार्गावरील संपूर्ण बंदोबस्ताची जबाबदारी पुणे जिल्हा ग्रामीण पोलिसांनी स्वीकारली. कडेकोट पोलीस बंदोबस्तात आणि विठ्ठलनामाच्या अखंड गजरात पालखी यवतच्या दिशेने मार्गस्थ झाली.




