Dehu : संत तुकाराम महाराजांची पालखी देहूत परतली; ज्ञानोबा-तुकारामच्या जयघोषाने देऊळवाडा दुमदुमला
सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती। रखुमाईच्या पती सोयरिया॥ या संत तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीप्रमाणे पंढरीच्या वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर विठ्ठलभक्तीचा आनंद ओसंडून वाहत होता.

पहाटे नित्यपूजा झाल्यानंतर पिंपरीगाव येथील श्री भैरवनाथ मंदिरातून पालखी सोहळा वारकरी, दिंडीकरी आणि भाविकांसह देहूकडे मार्गस्थ झाला. पुणे-मुंबई महामार्गावरून देहूरोडमार्गे चिंचोली येथील शनी मंदिराजवळ पालखीचा विसावा झाला. यावेळी अभंग आरती करण्यात आली.
दुपारी पालखी देहूच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दाखल होताच ग्रामस्थ आणि भाविकांनी फुलांचा वर्षाव केला. फटाक्यांची आतषबाजी करत पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. सुवासिनींनी पालखी रथाच्या बैलजोडीचे औक्षण केले. वेशीजवळ रामचंद्र तुपे कुटुंबीयांच्या वतीने दहीभाताचा नैवेद्य दाखविण्यात आला.
यावेळी संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. जालिंदर मोरे, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. विक्रमसिंह मोरे, ह.भ.प. लक्ष्मण मोरे, ह.भ.प. उमेश मोरे, विश्वस्त ह.भ.प. गणेश मोरे, ह.भ.प. वैभव मोरे आणि ह.भ.प. दिलीप मोरे यांच्यासह माजी अध्यक्ष, विश्वस्त, महाराजांचे वंशज, भाविक, देहू नगरपंचायतीचे नगरसेवक-नगरसेविका, अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात पालखी रथातून खांदेकऱ्यांनी पालखी खांद्यावर घेतली. पादुकांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. हनुमान मंदिरासमोर संतपर अभंग झाल्यानंतर पालखी मुख्य मंदिराकडे मार्गस्थ झाली. संत तुकाराम महाराजांच्या जन्मस्थानी आरती करण्यात आली.
मुख्य मंदिरात पालखीचे आगमन झाल्यानंतर चांदीची अब्दागिरी, गरुड टक्के आणि रेशमी छत्रासह पालखीची देऊळवाड्यात प्रदक्षिणा करण्यात आली. त्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आरती झाली. यावेळी वारकऱ्यांनी पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम असा जयघोष केला. तुतारी, शंख, नगारा आणि ताशांच्या गजराने मंदिर परिसर दुमदुमून गेला.
भजनी मंडपात संस्थानच्या वतीने सेवेकरी, मानकरी आणि दिंडीचालकांचा नारळ-प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित भाविकांना एकादशीचा फराळ आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. पालखी सोहळ्यादरम्यान सेवा बजावणारे पोलीस, गृहरक्षक दल, आरोग्य विभाग आणि वैद्यकीय पथकाचे संस्थानच्या वतीने आभार मानण्यात आले.




