Sant Tukaram Maharaj Palkhi: काटेवाडीत भक्तीचा पूर! मुक्या प्राण्यांनी घातली रथाला प्रदक्षिणा; पाहा पारंपरिक ‘मेंढ्यांचे रिंगण’
Sant Tukaram Maharaj Palkhi: "राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार आणि काटेवाडी ग्रामस्थांकडून पालखीचे जंगी स्वागत; 'पालखी ओटा' येथे रंगला पादुका दर्शन सोहळा.

Sant Tukaram Maharaj Palkhi – विठूनामाचा गजर, टाळ-मृदंगांचा नाद आणि अथांग जनसागर अशा भारावलेल्या वातावरणात काटेवाडी (ता. बारामती) येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात पारंपरिक ‘मेंढ्यांचे गोल रिंगण’ अत्यंत भक्तीभावाने पार पडले. हा डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा पाहण्यासाठी काटेवाडीसह राज्यभरातून आलेल्या हजारो वारकर्यांनी मोठी गर्दी केली होती.
दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास तुकोबांची पालखी काटेवाडीत दाखल झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते जय पवार आणि ग्रामस्थांनी पालखीचे भक्तिभावात स्वागत केले. त्यानंतर पालखी खांद्यावर घेऊन ‘पालखी ओटा’ येथे विसाव्यासाठी आणण्यात आली. येथे सुमारे दोन तास हजारो भाविकांनी पादुकांचे दर्शन घेतले.
दोन तासांच्या विसाव्यानंतर ग्रामस्थांनी पालखी पुन्हा खांद्यावर घेत काटेवाडी बस स्थानक परिसरात आणली आणि ती रथात विराजमान केली. यानंतर या सोहळ्याचे मुख्य आकर्षण असलेले मेंढ्यांचे भव्य रिंगण सुरू झाले. काटेवाडीतील स्थानिक मेंढपाळ महादेव काळे, राजेंद्र मासाळ, हरी महानवर, गुलाब महानवर, विकास केसकर, ज्ञानदेव पाटोळे आणि पांडुरंग हाके यांच्या मेंढ्यांच्या कळपाने माऊलींच्या रथाभोवती शिस्तीत धावत गोल प्रदक्षिणा घातली. मेंढ्या धावू लागताच उपस्थित जनसमुदायाने एकच विठूनामाचा जयघोष केला.
परंपरा अन् निसर्गाची साथ!
शेतकऱ्यांवरील संकटे दूर व्हावीत, राज्यात उत्तम पाऊस-पाणी व्हावे आणि बळीराजा सुखी-समाधानी व्हावा, या श्रद्धेने पूर्वीपासून ही मेंढ्यांच्या रिंगणाची परंपरा जपली जात आहे. आजचे रिंगण पूर्ण होताच निसर्गानेही जणू याची साक्ष दिली. रिंगण पार पडून पालखी जशी पुढे मार्गस्थ झाली, तसा काटेवाडी आणि परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली.
“तुकोबांच्या चरणी मुक्या प्राण्यांनी नतमस्तक होऊन घातलेली प्रदक्षिणा पाहूनच वरुणराजाने ही कृपादृष्टी केली,” अशी भावना यावेळी आनंदी झालेल्या शेतकऱ्यांनी व नागरिकांनी व्यक्त केली. हा नयनरम्य सोहळा अनुभवून पालखीने इंदापूर तालुक्यातील भवानीनगरकडे प्रस्थान केले.





