‘संत सावता क्रांती परिषद’ ही बहुजनांसाठी नवीन क्रांती घडवेल – आमदार योगेश टिळेकर

हडपसर : महाराष्ट्राच्या मातीतील श्री संत शिरोमणी सावता माळी महाराजांच्या प्रेरणेतून क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारकार्याचा वसा चालविण्यासाठी, त्यांच्या विचारातला सुशिक्षित समाज निर्माण करण्यासाठी, हिंदु -बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी ‘संत सावता क्रांती परिषद’ ही नवीन सामाजिक संघटना, चळवळ बहुजनांसाठी येणाऱ्या काळात क्रांती घडवेल, असे मत या परिषदेचे संस्थापक, अध्यक्ष व विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांनी व्यक्त केले.
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बुधवारी (दि.३०) या नवीन ‘संत सावता क्रांती परिषद’चे उद्घाटन होत. या नवीन परिषदेच्या उद्घाटनासाठी बहुजनांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष आमदार टिळेकर यांनी केले आहे.
नवीन परिषद उद्घाटनाच्या निमित्ताने ‘दैनिक प्रभात’शी बोलताना आमदार योगेश टिळेकर म्हणाले की, “श्री संत शिरोमणी सावता माळी महाराजांनी समाजात कर्माचे महत्त्व सांगत परमार्थ साधला. तर महात्मा फुले यांनी समाजात सत्याचा आधार घेत समतेची स्थापना केली. क्रांतिज्योती सावित्रीमाईंनी शिक्षणाचा प्रकाश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवला. या तिन्ही थोर व्यक्तींनी दाखवलेल्या मार्गावर चालत आम्ही समाजाच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी एकत्र येत आहोत.
‘संत सावता क्रांती परिषद’ ही फक्त एक संस्था नाही. तर, या समाजसुधारकांच्या शिकवणीचा वारसा पुढे घेऊन जाण्याची एक प्रतिज्ञा आहे. या परिषदेचा उद्देश बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावले उचलणे, आपला देव, देश, धर्म ,समता आणि न्यायाचे मूल्य समाजात रुजवणे तसेच शिक्षण, रोजगार व स्वावलंबनाच्या माध्यमातून समाजाला सक्षम बनवणे हा आहे.
या ऐतिहासिक परिषदेच्या माध्यमातून हिंदु बहुजन समाजाला एकसंध, सशक्त, आणि प्रगतीच्या वाटेवर नेण्याचा संकल्प करण्यात येत आहे. कर्म, समता, आणि शिक्षण या मूल्यांच्या अधिष्ठानावर उभारलेली ही क्रांती, समाजात एक नवी चेतना निर्माण करेल,” अशी भावना यावेळी आमदार योगेश टिळेकर यांनी व्यक्त केली.





