पिंपरी | संकल्प नशामुक्ती आणि सुरक्षित पर्यटनासाठी जनजागृती रॅली

लोणावळा (वार्ताहर) – लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या संकल्पनेतून लोणावळा शहरात रविवारी सकाळी संकल्प नशामुक्ती आणि सुरक्षित पर्यटन या विषयावर जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
रॅलीच्या शेवटी स्वतंत्र थिएटर पुणे यांनी उत्स्फूर्तपणे सुरक्षित पर्यटन – जबाबदार पर्यटन या विषयावर तसेच संकल्प नशामुक्ती याबाबत सादर केलेल्या पथनाट्याने सर्व उपस्थितांची मने जिंकली.
रविवारी सकाळी ९ वाजता लोणावळ्यातील कुमार हॉटेल ते भगवान महाविर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक यादरम्यान रॅली काढण्यात आली. लोणावळा शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी, जेष्ठ नागरिक संघ, महिला मंडळ, वेगवेगळ्या सामाजिक संस्था या रॅलीत सहभागी झाले होते.
रॅलीमध्ये सहभागी झालेल्यांना मार्गदर्शन करताना आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी सुरक्षित व जबाबदार पर्यटन, नियमांचे पालन, स्वच्छ व सुंदर शहर आणि नशामुक्त युवा पिढी घडविण्याबाबत संदेश दिला. तद्नंतर स्वतंत्र थिएटर, पुणे येथील कलावंतांनी पथनाट्य सादर केले.
पथनाट्याद्वारे जनजागृती –
लोणावळा शहरामध्ये यावर्षी पावसाळी हंगाम सुरू होताच भुशी धरणाच्या मागील बाजूला पर्यटकांचा एक भीषण अपघात होऊन पाच जणांना त्यामध्ये जलसमाधी मिळाली होती.
यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत येथील पर्यटन व्यवसायाला जबर फटका बसला. लोणावळा शहर हे केवळ महाराष्ट्रात नव्हे तर जागतिक स्तरावर प्रसिद्ध असे पर्यटन स्थळ आहे.
येथे आल्यानंतर पर्यटकांनी सुरक्षित पर्यटन कशा पद्धतीने करावे याबाबत पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती केली गेली.
तसेच यावेळी अनेक अप्रिय घटनांमध्ये आपला जीव धोक्यात टाकून बचाव कार्य करणाऱ्या शिवदुर्ग मित्र या संस्थेला आणि पथनाट्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत संदेश पोचवण्याचे काम करणाऱ्या स्वतंत्र थिएटर, पुणे यांना सन्मानित करण्यात आले.
लोणावळा शहरात आल्यानंतर पर्यटकांनी येथील निसर्गाचा आनंद घेत असताना स्वतःची सुरक्षितता राखणे हे देखील महत्त्वाचे आहे.
याकरिता सर्व पर्यटन स्थळांवर सूचनाफलक लावण्यात आले आहेत. तरी देखील अनेक वेळा पर्यटकांकडून त्याकडे कानाडोळा केला जातो. मात्र अशा घटनांमधून काही अप्रिय घटना घडत आहेत.
त्यामुळे संबंधित कुटुंबाला तर दुःख सहन करावे लागतेच, मात्र त्या पर्यटन स्थळाच्या नावलौकिकाला देखील बाधा निर्माण होत आहे.
लोणावळा शहर व मावळ तालुक्यात येणाऱ्या सर्व पर्यटकांनी आपल्या सुरक्षित पर्यटनाला प्राधान्य देणे गरजेचे असल्याने लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या संकल्पनेमधून हा सदरचा जनजागृती उपक्रम हाती घेण्यात आला.





