पिंपरी | …आणि रेल्वेत हरविलेली बॅग सर्व वस्तूंसह पुन्हा मिळाली

लोणावळा, (वार्ताहर) – रेल्वेने प्रवास करताना मौल्यवान वस्तू, महत्वाची कागदपत्रे, मोबाइल इत्यादी वस्तू हरविल्यास मोठे नुकसान होते. सोबत प्रचंड मनस्ताप देखील होतो. सहसा रेल्वेत हरविलेल्या वस्तू, कागदपत्रे पुन्हा मिळत नाहीत.
परंतु, जर काही कारणाने त्या वस्तू पुन्हा हाती आल्या तर होणारा आनंद अवर्णनीय असतो. असाच आनंद सोनाली गोरे यांना झाला आणि त्यांना हा आनंद मिळवून देणाऱ्या आहेत, आरपीएफच्या एएसआय अनिता रायबोले.
दिनांक २ सप्टेंबर २०२४ या दिवशी शिवाजीनगर ते लोणावळा या लोकल प्रवासात सोनाली गोरे यांचे तीन तोळे सोने आणि काही महत्वाची कागदपत्रे असणारी बॅग लोकल ट्रेनमधे राहून गेली.
घरी गेल्यानंतर त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली. तेव्हा त्या खूप दुःखी झाल्या. त्यानंतर त्यांनी लोणावळा रेल्वे पोलीस यांच्याशी संपर्क साधला.
अनिता रायबोले यांच्यासोबत त्या बोलल्या. रायबोले यांनी अगोदर सोनाली यांना मानसिक आधार दिला. त्यानंतर तक्रार कुठे आणि कशी नोंदवायची याबाबत मार्गदर्शन केले.
यानंतर रायबोले यांनी टीमसह तपासाची चक्रे फिरवली आणि हरवलेली बॅग शोधली. ती बॅग जेव्हा सोनाली गोरे यांना परत मिळाली, तेव्हा आपसूकच त्यांच्या ओठातून कृतज्ञतापूर्वक आभाराचे शब्द बाहेर पडले.





