पिंपरी | लोणावळा शहरवासीयांचा कर वाढीला विरोध

लोणावळा, (वार्ताहर) – नगरपरिषदेने लागू केलेली ३० टक्के पाणीपट्टी कर वाढ तात्काळ रद्द करावी, यासाठी नागरिकांनी आवाज उठविला आहे. तसेच, स्वच्छता विभागाचे लागू केलेले टेंडर रद्द करावे,
खासगी कंपनीला देण्यात आलेला कामाचा ठेका काढून घ्यावा आदी मागण्यांसाठी लोणावळा जागरूक नागरिक मंचाच्या वतीने शहरात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. नागरिकांनी या मोहिमेत मोठ्या प्रमाणात सहभाग घेत कर वाढीला विरोध दर्शविला आहे.
लोणावळा जागरूक नागरिक मंचच्या वतीने मागील आठवड्यात करण्यात आलेल्या आंदोलनानंतर लोणावळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक यांना रजेवर पाठविण्यात आले आहे.
तसेच, मुख्याधिकारी यांनी पदाचा गैरवापर करीत नागरिकांच्या पाणी पट्टीमध्ये ३० टक्के कर वाढ केली असून ही कर वाढ करत असताना शहरातील कोणत्याही नागरिकांना, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेतलेले नाही, असा आरोप करीत मंचच्या वतीने आता कर वाढीला देखील विरोध करण्यात येत आहे.
लोणावळा शहरामध्ये मागील काही वर्षांपासून स्वच्छता विभागाशी संबंधित कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ पुरवण्याची कामे वेगवेगळ्या ठेकेदारांच्या माध्यमातून केली जात होती. मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी मात्र हे सर्व ठेके एकत्रित करत एका कंपनीला ही सर्व कामे देण्याच्या हेतूने निविदा प्रक्रिया राबविली.
यावेळी पूर्वी पाच कोटी रुपयांमध्ये होत असलेली ही कामे करण्यासाठी १२ कोटी रुपयांची निविदा तयार करण्यात आली. त्यामधील अटी व शर्ती यादेखील नियमबाह्य पद्धतीने तयार करण्यात आल्याचा आरोप होत आहे.
कामाचा ठेका रद्द न झाल्याने आंदोलन सुरूच
ऐन सणासुदीच्या काळामध्ये जुन्या ठेकेदारांची कामे बंद करत नव्या कंपनीला कामाचा कार्यादेश देण्यात आला. मात्र त्यांची कोणतीही तयारी नसल्याने सणासुदीच्या काळामध्ये संपूर्ण लोणावळा शहरामध्ये कचऱ्याची गंभीर समस्या निर्माण झाली होती.
यामुळे संतप्त झालेल्या लोणावळाकर नागरिकांनी, सर्व राजकीय पक्ष व विविध संघटनांनी एकत्र येत नगर परिषदेच्या विरोधात आंदोलन सुरू केले. मागील काही दिवसांपासून हे आंदोलन सुरू असून अद्याप ठेका रद्द झाला नसल्याने मंचच्या वतीने शहरात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली आहे.





