पिंपरी | कैवल्यधाम योग संस्थेत राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

लोणावळा, (वार्ताहर) – कैवल्यधाम योग संस्था लोणावळा येथे भारतीय योग असोसिएशन व आयुष मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने योग सांस्कृतिक समन्वयाचे एक साधन या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या परिषदेच्या पहिल्या सत्राचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आले. आंतरराष्ट्रीय ख्याती असलेली कैवल्यधाम योग संस्था यावर्षी शतकपूर्ती करत आहे. या निमित्त राष्ट्रीय परिषदेचे दोन सत्रांमध्ये आयोजन करण्यात आले आहे.
परिषदेची सुरुवात शांतीपाठाने करण्यात आली. यानंतर प्रमुख पाहुणे न्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते तसेच निवृत न्यायाधीश आणि कैवल्यधाम गव्हर्निंग बॉडीचे सभासद एस. राधाकृष्णन, आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा, लेफ्टनंट जनरल डॉ. ए. के. सिंग, माजी न्यायाधीश रमेश धानुका, प्रोफेसर गोपालकृष्ण जोशी,
ज्येष्ठ वकील संतोष पॉल, प्रोफेसर गिरीश चंद्र त्रिपाठी तसेच कैवल्यधाम संस्थेचे मानद सचिव व प्रमुख कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन करून राष्ट्रीय संमेलनाच्या पहिल्या सत्राचे उदघाटन करण्यात आले.
सुबोध तिवारी यांनी स्वागतपर भाषण केले आणि प्रमुख पाहुण्यांचा शाल आणि कैवल्यधाम शताब्दी वर्षाची मुद्रा देऊन सन्मानित केले. माजी न्यायाधीश रमेश धानुका यांनी बोलताना योगाचे महत्त्व विशद केले.
यानंतर कैवल्यधाम संस्थेचा १०० वर्षांचा प्रवास यावरील माहितीपट संक्षिप्त स्वरुपात दाखविण्यात आला. यानंतर निवृत्त न्यायाधीश एस. राधाकृष्णन तसेच आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्रद्य राजेश कोटेचा यांनी आपली मनोगते व्यक्त केली आणि कैवल्यधाम संस्थेच्या शताब्दी वर्षास शुभेच्छा दिल्या.
तदनंतर कैवल्यधाम संस्थेच्या शताब्दी वर्षात राबविण्यात आलेल्या प्रमुख कार्यक्रमांची चित्रफित दाखविण्यात आली.
न्यायमूर्ती भूषण गवई म्हणाले, योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनवा, योगामुळे आपले आरोग्य व मन निरोगी राहणार आहे. ही फार मोठी शक्ती आहे. १९० देशात योगाचा स्वीकार करण्यात आला आहे.
२१ जून हा दिवस जागतिक योग दिवस म्हणून साजरा केला जातो. आपले शारीरिक व मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी योग महत्वाची भूमिका बजावते.
सर्वोच्च न्यायालयात देखील जागतिक योग दिवस साजरा केला जात आहे. योगाचा प्रचार व प्रसार करणा-या कैवल्यधाम संस्थेच्या शतक महोत्सवी वाटचालीला शुभेच्छा दिल्या.
संमेलनामध्ये कैवल्यधाम संस्थेचा अधिकारी वर्ग, संस्थेचे कार्यकारी मंडळ सदस्य आणि योग महाविद्यालयातील विद्यार्थी, के. जे. सोम्मया कॉलेज, विद्याविहार, मुंबई चे विद्यार्थी, योग विद्या धाम, पिंपरी- चिंचवड शाखेचे योग शिक्षक, लोणावळ्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.
तसेच ऑनलाइन प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमापूर्वी प्रमुख पाहुणे यांनी कैवल्यधाम संस्थेच्या संदीपनी ग्रंथालय तसेच चित्र शाळेस भेटी दिल्या आणि माहिती जाणून घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन योग शिक्षिका श्रीमती ममता बिष्ट यांनी केले. कार्यक्रमाची सांगता शांतीपाठाने करण्यात आली.





