Sanju Samson : विश्वविजेता संजू आता बनणार ‘कॅप्टन सॅमसन’! माजी खेळाडूच्या विधानाने खळबळ; सूर्याची सुट्टी होणार?
Sanju Samson : या दमदार कामगिरीनंतर आता सूर्यकुमार यादवच्या जागी संजू सॅमसनला टी-२० संघाचे नेतृत्व देण्याबाबत क्रिकेट वर्तुळात खल सुरू झाला आहे.

Sanju Samson next Team India T20 Captain : अहमदाबाद येथे पार पडलेल्या महामुकाबल्यात टीम इंडियाने न्यूझींलडचा एकतर्फी पराभव करत तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषक ट्रॉफीवर नाव कोरलं. या स्पर्धेचा ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ ठरलेल्या संजू सॅमसनने आपल्या बॅटने टीकाकारांची तोंडे बंद केली . संजूने ५ सामन्यांत ८०.२५ च्या सरासरीने ३२१ धावा कुटल्या. या दमदार कामगिरीनंतर आता सूर्यकुमार यादवच्या जागी संजू सॅमसनला टी-२० संघाचे नेतृत्व देण्याबाबत क्रिकेट वर्तुळात खल सुरू झाला आहे.
कर्णधारपदासाठी संजूचे पारडे जड का?
सध्या भारतीय टी-२० संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत असला तरी, विश्वचषकातील त्याची वैयक्तिक कामगिरी निराशाजनक राहिली आहे. सूर्याचे वय (३५ वर्षे) पाहता २०२८ च्या विश्वचषकापर्यंत तो ३७ वर्षांचा असेल. अशा परिस्थितीत बीसीसीआय शुबमन गिलप्रमाणेच टी-२० मध्येही खांदेपालट करण्याची शक्यता आहे. या शर्यतीत संजू सॅमसनचे नाव आघाडीवर आहे, कारण त्याच्याकडे आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचे यशस्वी नेतृत्व करण्याचा दांडगा अनुभव आहे.
मोहम्मद कैफचा मोठा दावा –
Sanju Samson @IamSanjuSamson can lead India in Next T20 World Cup @MohammadKaif #worldcup pic.twitter.com/f37131rUQR
— Ravish Bisht (@ravishbofficial) March 10, 2026
माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफने संजूच्या कर्णधारपदाचे समर्थन केले आहे. कैफ म्हणाला की, “संजू सॅमसनमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. एक चांगला कर्णधार तोच असतो, ज्याने चढ-उतार पाहिले आहेत आणि जो खराब फॉर्ममधून जाणाऱ्या खेळाडूंना साथ देऊ शकतो. संजूने स्वतःच्या करिअरमध्ये खूप संघर्ष केला आहे, त्यामुळे तो खेळाडूंची मानसिक स्थिती उत्तम समजू शकतो.”
आयपीएलमधील अनुभव आणि नवा प्रवास –
संजू सॅमसनने २०२१ ते २०२५ या काळात राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व केले असून २०२२ मध्ये त्याने संघाला फायनलपर्यंत नेले होते. आता आयपीएल २०२६ मध्ये तो चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) जर्सीत दिसणार आहे. धोनीच्या सहवासात संजूच्या नेतृत्वगुणाला अधिक पैलू पडतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





