Pakistan Veterans Cricket : भारतात पाय ठेवण्यास पाकिस्तानचा पुन्हा नकार! गतविजेता असूनही मास्टर्स वर्ल्डकपमधून घेतली माघार; पीसीबीचा मोठा निर्णय
Pakistan Veterans Cricket : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने २०२७ मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मास्टर्स क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत संघ पाठवण्यास नकार दिला आहे. पाकिस्तान वेटरन्स क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख फवाद एजाज यांनी सांगितले की, संघाने या स्पर्धेतून माघार घेतली आहे.

Pakistan Refuses Permission to Veterans Cricket Team for Masters World Cup in India : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण राजकीय संबंधांचा फटका आता पुन्हा एकदा क्रीडा क्षेत्राला बसला आहे. पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात भारतात आयोजित करण्यात येणाऱ्या इंटरनॅशनल मास्टर्स क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पीसीबीने आपल्या ५० वर्षांवरील वेटरन्स क्रिकेट संघाला परवानगी नाकारली आहे. गतवर्षी श्रीलंकेत झालेली ही स्पर्धा पाकिस्तानने जिंकली होती; मात्र यंदा विद्यमान चॅम्पियन असतानाही पीसीबीने पाकिस्तान वेटरन्स क्रिकेट असोसिएशनला (PVCA) भारतात खेळण्यास थेट मनाई केली आहे.
गृहमंत्री आणि पीसीबी प्रमुख मोहसिन नकवींचा नकार –
पाकिस्तान वेटरन्स क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख फवाद एजाज यांनी सांगितले की, “आम्ही आयोजकांना स्पर्धेतून माघार घेत असल्याचे अधिकृतपणे कळवले असून त्यांना पर्यायी संघाची व्यवस्था करण्यास सांगितले आहे.” एजाज यांच्या मते, भारताने आणि स्पर्धा आयोजकांनी संघाला वेळेत व्हिसा आणि उच्च दर्जाची सुरक्षा देण्याचे पूर्ण आश्वासन दिले होते. मात्र, पाकिस्तानचे गृहमंत्री आणि पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी परराष्ट्र व गृह मंत्रालयाचा दाखला देत भारतीय भूमीवर खेळण्यास स्पष्ट नकार दिला.
हॉकीनंतर आता क्रिकेटमधूनही पाकिस्तानची माघार –
PAKISTAN NOT TO PARTICIPATE IN OVER-50s CRICKET WORLD CUP IN HYDERABAD INDIA IN JANUARY 2027 https://t.co/ZdFP4d2Nnc
— Pakistan Veterans Cricket (@CricketVeterans) October 20, 2026
क्रीडा स्पर्धेतून माघार घेण्याची पाकिस्तानची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी पाकिस्तान हॉकी महासंघानेही संवेदनशील द्विपक्षीय संबंधांचे कारण पुढे करत आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपला पुरुष हॉकी संघ भारतात पाठवण्यास नकार दिला होता, ज्यानंतर बांगलादेशला संधी देण्यात आली होती. याशिवाय सुरक्षेचे कारण सांगत पाकिस्तानने मागील वर्षी तमिळनाडूमध्ये झालेल्या एफआयएच ज्युनियर विश्वचषक आणि आशिया चषकातूनही आपले नाव मागे घेतले होते.
२००८ च्या मुंबई हल्ल्यानंतर द्विपक्षीय मालिका ठप्प –
नोव्हेंबर २००८ मधील मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील राजकीय व क्रीडा संबंधांमध्ये मोठी कटुता आली. भारताने शेवटचा पाकिस्तान दौरा जुलै २००८ मध्ये आशिया चषकासाठी केला होता, तर २००५-०६ मध्ये अखेरची द्विपक्षीय मालिका खेळली गेली होती. हॉकीमध्येही २००६ नंतर कोणतीही द्विपक्षीय मालिका झालेली नाही. पाकिस्तानने २०२३ मध्ये भारतात आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी खेळली होती, जिथे त्यांना पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.
केवळ तटस्थ ठिकाणीच आमनेसामने सामने –
🏏🇵🇰 GRAND OPENING CEREMONY OF THE “IMC OVER-40s CRICKET WORLD CUP 2026” IN GUYANA! 🇬🇾🌎
The Opening Ceremony of the “IMC Over-40s World Cup 2026” was held last night at the Providence Stadium, Guyana, with the Chairman of International Masters Cricket (IMC) also in attendance. https://t.co/FFrMEhp0R3
— Pakistan Veterans Cricket (@CricketVeterans) October 17, 2026
दोन्ही देशांमधील सातत्याने बिघडलेल्या राजनैतिक संबंधांमुळे भारत आणि पाकिस्तानचे संघ केवळ आयसीसी आणि आशिया चषक स्पर्धांमध्येच एकमेकांविरुद्ध खेळतात. हे सामनेसुद्धा सुरक्षेच्या कारणास्तव बहुतांश वेळा तटस्थ मैदानांवरच आयोजित केले जातात. आता मास्टर्स विश्वचषकातूनही पाकिस्तानने माघार घेतल्यामुळे भारतीय मैदानावर रंगणारा दोन्ही देशांतील माजी दिग्गजांचा संभाव्य सामना पाहण्यापासून क्रिकेटप्रेमी वंचित राहणार आहेत.





