Virat Rohit WC 2027 : रोहित अन् विराट २०२७ चा वर्ल्डकप खेळणार की नाही? BCCI अध्यक्षांनी थेट सांगून टाकली ‘ती’ एक महत्त्वाची अट!
Virat Rohit WC 2027 : बीसीसीआयचे अध्यक्ष मिथुन मन्हास यांनी म्हटले आहे की, २०२७ च्या विश्वचषकासाठी रोहित आणि कोहलीसारख्या खेळाडूंची निवड वयाच्या आधारावर न होता, तंदुरुस्ती आणि कामगिरीच्या आधारावर केली जाईल.

Mithun Manhas on Rohit Sharma and Virat Kohli Selection for World Cup 2027 : भारतीय क्रिकेट संघाचे दोन आधारस्तंभ रोहित-विराट आगामी २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकात खेळणार की नाही, याबाबत क्रिकेट वर्तुळात सातत्याने चर्चा रंगत आहेत. रोहितच्या मर्यादित षटकांच्या भवितव्यावरही अनेक तर्कवितर्क लावले जात होते. माजी मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने रोहितच्या जागी यशस्वी जैस्वालला संधी देण्याची तयारी केली होती; मात्र इंग्लंड दौऱ्यातील दमदार कामगिरीच्या जोरावर रोहितने संघात आपले स्थान कायम राखले. या सर्व पार्श्वभूमीवर, बीसीसीआयचे अध्यक्ष मिथुन मन्हास यांनी २०२७ च्या विश्वचषकातील या दिग्गजांच्या निवडीबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक वक्तव्य केले आहे.
वयाची कोणतीही अट नाही; फिटनेस आणि कामगिरीच सर्वोच्च निकष –
न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी ‘स्पोर्ट्सस्टार’शी संवाद साधताना मिथुन मन्हास यांनी स्पष्ट केले की, विश्वचषकासाठी रोहित आणि विराटची निवड केवळ फिटनेस आणि फॉर्मवर अवलंबून असेल. मन्हास म्हणाले की, “माझ्या मते निवडीसाठी केवळ फिटनेस आणि मैदानावरील कामगिरी हेच मुख्य निकष असायला हवेत, वय अजिबात नाही. जर एखादा खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त असेल, सातत्याने धावा करत असेल आणि देशाला सामने जिंकून देत असेल, तर तीच सर्वात महत्त्वाची गोष्ट ठरते.” २०२७ चा एकदिवसीय विश्वचषक ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे खेळवला जाणार आहे.
शुबमन गिलला कर्णधार म्हणून मिळणार दिग्गजांचा भक्कम पाठिंबा –
Virat Kohli and Rohit Sharma will be judged on their fitness and performance ahead of the 2027 ODI World Cup, not their age, BCCI president Mithun Manhas has said ahead of India’s tour of New Zealand.
#ViratKohli #RohitSharma #BCCI #ODIWorldCup2027 #IndianCricket https://t.co/FKVXGnYJxB
— IndiaToday (@IndiaToday) October 21, 2026
रोहित आणि विराट या दोघांनीही टी-२० आणि कसोटी फॉरमॅटमधून निवृत्ती स्वीकारली असून, ते सध्या केवळ एकदिवसीय क्रिकेट खेळत आहेत. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने २०२३ च्या विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती. आता भावी कर्णधार शुबमन गिल याच्या नेतृत्वाबाबत बोलताना मन्हास म्हणाले की, गिलकडे आयपीएल आणि भारताचे नेतृत्व करण्याचा २-३ वर्षांचा अनुभव आहे. विराट, रोहित आणि हार्दिक पंड्या संघात असल्याने गिलला मैदानावर मोठे मार्गदर्शन मिळेल. याशिवाय जसप्रीत बुमराहसारखा अनुभवी खेळाडू नेतृत्वाचा भार हलका करू शकतो.
न्यूझीलंड दौऱ्यात रंगणार पाच एकदिवसीय सामने –
भारतीय संघाच्या आगामी न्यूझीलंड दौऱ्यासाठी वनडे आणि कसोटी संघांची घोषणा आधीच करण्यात आली आहे. टी-२० मालिका संपल्यानंतर भारतीय संघ किवींविरुद्ध पाच एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील रोहित आणि विराटच्या कामगिरीवर सर्वांचे बारीक लक्ष असेल, कारण ही मालिका २०२७ च्या विश्वचषक मोहिमेचा पाया मानली जात आहे.





