Sanju Samson : ‘माझी क्षमता जगासमोर दाखवण्यासाठी…’, राजस्थान संघापासून वेगळं होण्याच्या चर्चेदरम्यान सॅमसनचं मोठं वक्तव्य

Sanju Samson on Rajasthan Royals : आयपीएलमधील आपल्या भविष्याबाबतच्या चर्चांदरम्यान, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने फ्रँचायझीचे आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल आभार मानले आहेत. सॅमसनने 2013 मध्ये युवा यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून राजस्थान रॉयल्सकडून पदार्पण केले होते आणि नंतर तो संघाचा कर्णधार बनला. आता संघ सोडण्याच्या चर्चा सुरु असताना 30 वर्षीय संजूने अश्विनच्या कार्यक्रमात राजस्थान रॉयल्सबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.
सॅमसन राजस्थान रॉयल्सबद्दल काय म्हणाला?
संजू सॅमसनने आर. अश्विनशी बोलताना सांगितले, “राजस्थान रॉयल्स माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. केरळमधील एका छोट्या गावातून आलेल्या मुलाला आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळाली. राहुल द्रविड सर आणि मनोज बदाले सर यांनी मला माझी क्षमता जगासमोर दाखवण्यासाठी व्यासपीठ दिले. फ्रँचायझीने सुरुवातीपासून माझ्यावर विश्वास दाखवला आणि हा प्रवास खूपच सुंदर आहे. मला अशी फ्रँचायझी मिळाल्याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे.”
सॅमसन का सोडू शकतो राजस्थानची साथ?
आयपीएल 2025 हंगामात राजस्थान रॉयल्सची कामगिरी खराब राहिली आणि संघ नवव्या स्थानावर राहिला. सॅमसन दुखापतीमुळे केवळ 9 सामने खेळू शकला. काही माध्यमांमध्ये सॅमसन आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्या आल्या, परंतु द्रविड यांनी हे नाकारले आहे. सॅमसनने आतापर्यंत 11 हंगामांत 155 सामन्यांमध्ये खेळताना 150 डावांत 4,219 धावा केल्या आहेत, ज्यामुळे तो राजस्थान रॉयल्सच्या इतिहासातील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे.
हेही वाचा – Sanju Samson : ‘२१ वेळा शून्यावर आऊट झालास तरच बाहेर…!’, सूर्या आणि गंभीरच्या शब्दांनी संजूला दिली नवी उभारी
क्रिकबझच्या अहवालानुसार, सॅमसन आपल्या भविष्याचा विचार करत आहे, कारण संघात यशस्वी जैस्वाल आणि वैभव सूर्यवंशी यांची नवी सलामी जोडी उदयास आली आहे. यामुळे सॅमसनला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागेल, जी त्याला फारशी आवडत नाही. राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2025 साठी सॅमसनला 18 कोटी रुपयांत कायम ठेवले होते. मात्र, असे असले तरी, सॅमसन 2026 हंगामापूर्वी नव्या आयपीएल संघात नव्याने सुरुवात करण्याच्या विचारात असल्याची माहिती आहे.





