‘संजीवन वन उद्यान’ ऑक्सिजन पार्क म्हणून नावारूपाला येईल – उपमुख्यमंत्री पवार

पुणे – “संजीवन वन उद्यान’ एका देखण्या उद्यानात रुपांतर हे जैवविविधता संवर्धनाचे आदर्श उदाहरण ठरेल. जैवविविधता जोपासणारे हे उद्यान “ऑक्सिजन पार्क’ म्हणून नावारूपाला येईल. सौंदर्यीकरण, प्रदूषण नियंत्रणाबरोबरच वारजे, कोथरूड परिसरातील नागरिकांसाठी एक चांगला ऑक्सिजन पार्क तयार होईल, असे मत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. पुणे महानगर परिसरात वनविभागाच्या टेकड्या व जागा आहेत, तेथेही देशी वृक्षारोपणाला प्राधान्य द्यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
वारजे येथील डुक्कर खिंडीजवळ वनविभागाच्या 35 एकर जागेत महानगरपालिका व वन विभागाच्या विद्यमाने “संजीवन वन उद्यान’ उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. यावेळी वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, मनपा विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, नगरसेवक प्रशांत जगताप, बाबुराव चांदेरे, नगरसेवक दिलीप बराटे, सचिन दोडके, नगरसेविका लक्ष्मी दुधाने, बाबा धुमाळ यासह मनपा आयुक्त विक्रमकुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार, मुख्य वनसंरक्षक सुजय दोडल, उपवनसंरक्षक राहुल पाटील उपस्थित होते.
“संजीवन वन उद्यान’ प्रकल्पामुळे पर्यावरण संवर्धनास मदत होणार असल्याचे सांगत पवार म्हणाले, या उद्यानामध्ये विविध प्रकारचे वृक्ष पाहण्यास मिळणार आहे. करोनामुळे ऑक्सिजनचे महत्त्व सर्वांनाच समजले आहे. त्यासाठी आपण अनेक ऑक्सिजन प्लांट्स तयार केले. मात्र हा नैसर्गिक प्लांट असून हे टिकवणे गरजेचे आहे. अन्यथा भावी पिढी आपल्याला माफ करणार नाही. त्यामुळे वृक्षारोपनासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचेळी त्यांनी सांगितले. प्रास्ताविक दीपाली धुमाळ यांनी केले.





