Sanjay Shirsat : “भोंदूबाबा खरात प्रकरण महाराष्ट्रावरचा कलंक!”; मंत्री संजय शिरसाट यांचा संताप
Sanjay Shirsat : अशोक खरात बलात्कार प्रकरणावरून संजय शिरसाट यांनी कडक शब्दांत टीका केली आहे.

Sanjay Shirsat : निवृत्त मर्चंट नेव्ही अधिकारी असल्याचा दावा करणारा आणि कॅप्टन म्हणून ओळखला जाणारा स्वयंघोषित बाबा अशोक खरातचे प्रकरण महाराष्ट्रावरचा एक कलंक आहे आणि या प्रकरणी कठोर कारवाई केली गेली पाहिजे, असे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. एका महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अशोक खरातला बुधवारी अटक करण्यात आली आहे.
पत्रकारांशी बोलताना शिरसाट म्हणाले, हे प्रकरण महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यावरचा एक डाग आहे आणि या प्रकरणी कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. अनेक व्यक्ती खरातच्या संपर्कात आल्या होत्या. त्यांना भेटताना त्यांच्या मनात नक्की काय चालले होते, हे आपल्याला माहित नाही.
जर कोणाला खरात यांचे कृत्य माहित असूनही त्यांनी त्याची भेट घेतली असेल, किंवा जर कोणी अजूनही त्याला मदत करत असेल, तर तो एक गुन्हाच आहे. खरातचे अनेक प्रमुख नेत्यांसोबतचे छायाचित्रे समोर आली आहेत, परंतु याचा अर्थ असा होत नाही की त्या व्यक्तींचे खरातशी काही संबंध आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मंत्रिमंडळातील सहकारी राधाकृष्ण विखे पाटील आणि दीपक केसरकर यांच्यासह नोव्हेंबर २०२२ मध्ये सिन्नर येथील मंदिरात खरातची भेट घेतली होती.
खरातशी असलेल्या संबंधांमुळे टीकेचे धनी ठरलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी शुक्रवारी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.या स्वयंघोषित बाबाला कथितरित्या आश्रय देणाऱ्या मंत्र्यांसह या प्रकरणातील मोठ्या माशांचीही चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.




