Politics : अखेर ठरलं! इंडिया आघाडीत मोठी फूट; शरद पवारांचा सीमांकन विधेयकावर मोदी सरकारला पाठिंबा
Politics : डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले. सुप्रिया सुळे यांनी मात्र विधेयकाचा मसुदा तपासून निर्णय घेण्याची भूमिका मांडली आहे.

Politics : लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशन विधेयकावरून राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या प्रक्रियेला पाठिंबा देण्याची भूमिका मांडली आहे. शरद पवार यांची मुंबईतील रुग्णालयात भेट घेतल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. त्यामुळे काँग्रेससह विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीसमोर नवे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.
मात्र, या भूमिकेवरून पक्षाचा अधिकृत निर्णय झाल्याचे निश्चितपणे म्हणता येणार नाही. कारण खासदार सुप्रिया सुळे यांनी विधेयकाचा मसुदा पाहिल्यानंतरच पक्षाची भूमिका स्पष्ट होईल, असे सांगितले आहे. त्यामुळे आव्हाड यांच्या विधानानंतरही पक्षाच्या अंतिम भूमिकेबाबत संभ्रम कायम आहे.
सर्व राज्यांना समान ५० टक्के जागा वाढवण्याची अट –
डिलिमिटेशन म्हणजे लोकसंख्येतील बदल आणि इतर निकष लक्षात घेऊन लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना करणे. यात मतदारसंघांच्या सीमा बदलणे आणि लोकसभेतील राज्यांच्या जागांची संख्या ठरवणे यांचा समावेश होतो.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाचा पाठिंबा स्पष्ट करताना सर्व राज्यांमध्ये लोकसभेच्या जागा समान प्रमाणात ५० टक्क्यांनी वाढवण्याची अट असल्याचे सांगितले. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या नव्या प्रस्तावानुसार लोकसभेतील जागांची संख्या ५४३ वरून ८१५ करण्याचा विचार आहे. तसेच पुढील २५ वर्षे म्हणजे २०५१ पर्यंत राज्यांचे लोकसभेतील सध्याचे प्रमाण कायम ठेवण्याचा प्रस्ताव आहे.
इंडिया आघाडीच्या बैठकीला सुप्रिया सुळे अनुपस्थित –
दरम्यान, संसद अधिवेशनातील विरोधकांची रणनीती ठरवण्यासाठी इंडिया आघाडीची बैठक २८ नोव्हेंबरला दिल्लीत होणार आहे. मात्र, या बैठकीला सुप्रिया सुळे उपस्थित राहणार नाहीत. वडील शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्याने आपण मुंबईतच थांबणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. पवार यांना शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे गुरुवारी दक्षिण मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावरील संदेशातून आपण ३० नोव्हेंबरला संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी दिल्लीला जाणार असल्याचे सांगितले. त्यांच्या अनुपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अन्य खासदार इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी होणार असल्याचे वृत्त आहे.
विधेयकाचा मसुदा पाहूनच अंतिम निर्णय –
यापूर्वी सुप्रिया सुळे यांनीही पक्षाची भूमिका स्पष्ट केली होती. विधेयकाचा मसुदा अद्याप पाहिलेला नाही. त्यामुळे त्यातील तरतुदी समजून घेतल्यानंतरच निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले होते. महिला आरक्षणाची अंमलबजावणी, सर्व राज्यांमध्ये लोकसभेच्या जागांमध्ये समान ५० टक्के वाढ आणि मतदारसंघ पुनर्रचना आयोगात विरोधी पक्षांना योग्य प्रतिनिधित्व या मुद्द्यांवर पक्षाचा भर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.
दरम्यान, संसदेचे विशेष अधिवेशन ३० नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. लोकसभेचे कामकाज ३० नोव्हेंबरपासून, तर राज्यसभेचे कामकाज २ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनात सरकार डिलिमिटेशन आणि महिला आरक्षणाशी संबंधित विधेयक मांडण्याची शक्यता आहे.
आव्हाड यांच्या विधानामुळे विरोधी पक्षांच्या भूमिकेत मतभेद असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा अंतिम निर्णय विधेयकातील तरतुदींचा अभ्यास केल्यानंतर स्पष्ट होणार आहे.





