Top 15 News : डिलिमिटेशनवरून इंडिया आघाडीत हालचाली ते ठाकरेंचे उर्वरित खासदारही फुटणार? वाचा आजच्या टॉप 15 बातम्या
Top 15 News : डिलिमिटेशनवरून इंडिया आघाडीत हालचाली ते ठाकरेंचे उर्वरित खासदारही फुटणार? वाचा आजच्या टॉप 15 बातम्या

Top 15 News : 1) डिलिमिटेशन विधेयकावरून इंडिया आघाडीत हालचाली
स्टॅलिन यांची भेट घेत केली मनधरणी
मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला विरोध करण्यासाठी काँग्रेसकडून इंडिया आघाडीतील घटक पक्षांची एकजूट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. डीएमकेचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांनी या विधेयकाला पाठिंबा दर्शवल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी त्यांची भेट घेतली. राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख नेते चेन्नईत दाखल झाले. त्यांनी स्टॅलिन यांच्या निवासस्थानी भेट घेऊन विधेयकाबाबत चर्चा केली आणि आपली भूमिका बदलण्याची विनंती केल्याचे सांगितले जातेय. या बैठकीत इंडिया आघाडीतील सहा पक्षांचे नेते सहभागी झाले होते. दरम्यान, बैठकीनंतर स्टॅलिन आणि उदयनिधी एकाच गाडीतून निवासस्थानी परतले, तर इंडिया आघाडीचे अन्य नेते हॉटेलमध्ये थांबले. या चर्चेनंतर स्टॅलिन आपली भूमिका बदलणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेय. (Top 15 News)
2) ठाकरेंच्या शिवसेनेचे उर्वरित खासदारही फुटणार?
उदय सामंतांचा संजय राऊतांना पलटवार
डिलिमिटेशन विधेयकावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेवरून खासदार संजय राऊत यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती. त्याला मंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलेय. “असं बोलता बोलता यांचेही शिल्लक असलेले खासदार फुटणार आहेत,” असे सूचक विधान उदय सामंत यांनी केले. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेतील उर्वरित तीन खासदारही पक्षाची साथ सोडणार का, अशी चर्चा सुरू झालीय. दरम्यान, खासदार अरविंद सावंत यांनी या विधेयकाला पक्षाचा ना विरोध आहे, ना पाठिंबा, अशी भूमिका मांडली होती. त्यामुळे आगामी मतदानावेळी ठाकरे गटाची भूमिका काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेय. (Top 15 News)
3) फडणवीसांनी कन्नडमध्ये बोलून मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळलं
सतेज पाटलांचा हल्लाबोल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेळगावात कन्नड भाषेत भाषण करून सीमाभागातील मराठी माणसाचा अपमान केल्याचा आरोप काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केलाय. मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळल्याचे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरणाची मागणी केली. दरम्यान, डिलिमिटेशन विधेयकाला काँग्रेसचा विरोध कायम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महिला आरक्षणाला विरोध नसून, २०२३ मध्ये मंजूर झालेल्या कायद्याची अंमलबजावणी २०२९ च्या लोकसभा निवडणुकीपासून करावी, अशी मागणी सतेज पाटील यांनी केलीय. (Top 15 News)
4) पुण्याच्या खासदार मेधा कुलकर्णींना केंद्रात मोठी जबाबदारी
राज्यसभेचे कामकाज चालवण्याची मिळणार संधी
पुण्याच्या भाजप खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांच्यावर संसदेच्या वरिष्ठ सभागृहात महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. त्यांची राज्यसभेच्या उपसभापती पॅनेलवर नियुक्ती करण्यात आलीय. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी ही नियुक्ती केली. सभापती अनुपस्थित असताना पॅनेलमधील सदस्यांना राज्यसभेचे कामकाज चालवण्याची जबाबदारी दिली जाते. यामध्ये सभागृहातील चर्चा नियंत्रित करणे, सदस्यांना बोलण्याची संधी देणे आणि कामकाज शिस्तबद्धपणे पुढे नेणे अशा जबाबदाऱ्यांचा समावेश आहे. या नियुक्तीबद्दल त्यांनी सभापतींसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले आहेत. (Top 15 News)
5) डिलिमिटेशन विधेयकावर फेरविचार करावा
शरद पवारांना उद्धव ठाकरेंचे आवाहन
मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाम विरोध दर्शवलाय. या विधेयकामुळे देशाचे नुकसान होईल, त्यामुळे पक्षहित बाजूला ठेवून देशहिताला प्राधान्य देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सीमांकन प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा आरोप करत, सत्ताधाऱ्यांना अनुकूल मतदारसंघ तयार केले जातील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. मुंबई महापालिकेतील सीमांकन प्रक्रियेचा अनुभवही त्यांनी यावेळी सांगितला. विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी मलाही निरोप आले नसतील का, असा सवाल करत त्यांनी शरद पवार यांना या विषयावर फेरविचार करण्याचे आवाहन केले. विधेयकाला विरोध करण्यामागे देशहिताचा विचार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. (Top 15 News)
6) रायगडमध्ये ११ देशांतील अधिकाऱ्यांना मत्स्यपालनाचे प्रशिक्षण
मत्स्यव्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञान आणि शाश्वत मत्स्यपालन पद्धतींचा अभ्यास करण्यासाठी ११ देशांतील सरकारी अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात दाखल झाले. ICAR-CIFE, मुंबई आणि आफ्रिकन-एशियन रुरल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (AARDO), नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत गोवे येथील हान्स ॲक्वाकल्चर फार्ममध्ये हे प्रशिक्षण घेण्यात आले. बांगलादेश, इजिप्त, केनिया, श्रीलंका, मॉरिशससह ११ देशांतील अधिकारी सहभागी झाले. त्यांना एकात्मिक मत्स्यपालन, मत्स्यशेती व्यवस्थापन आणि शाश्वत मत्स्यव्यवसाय मॉडेलचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्ञानाची देवाणघेवाण झाली. (Top 15 News)
7) एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या मनातील मुख्यमंत्री
संजय गायकवाड यांचं वक्तव्य
महाराष्ट्राच्या जनतेला पुन्हा एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून हवे आहेत, असा दावा शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केलाय. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या मनातील मुख्यमंत्री असून, ‘या राज्याचा नाथ एकनाथ पुन्हा हवावा, हे महाराष्ट्र बोलतोय,’ असे वक्तव्य त्यांनी केले. यावेळी गायकवाड यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतही भाष्य केले. फडणवीस हे मोठे नेते असून, त्यांच्यात देशाची जबाबदारी सांभाळण्याची क्षमता आहे. त्यामुळे त्यांनी देशाची जबाबदारी सांभाळावी, असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील मुख्यमंत्रीपदावरून राजकीय चर्चेला पुन्हा सुरुवात झालीय. (Top 15 News)
8) रील्सच्या नादात कार थेट रेल्वे ट्रॅकवर कोसळली
माथेरान घाटात थरारक घटना
माथेरान घाटात रील्स बनवण्याच्या नादात पर्यटकांची कार २५ ते ३० फूट खोल रेल्वे ट्रॅकवर कोसळल्याची घटना घडली. नेरळ ते माथेरानदरम्यानच्या जुम्मापट्टी रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला. रस्त्याच्या कडेला कार उभी करून रील्स बनवत असताना अंदाज चुकल्याने कार खाली कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. कर्जतजवळील डिकसळ येथील सूरज पटेल हा बदलापूरमधील मित्र-मैत्रिणींसह माथेरानला आला होता. कारमध्ये दोन पुरुष आणि तीन महिला असे पाच जण होते. मात्र, अपघातावेळी कारमध्ये कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. विशेष म्हणजे, त्याच वेळी मिनी ट्रेन जुम्मापट्टी स्थानकात दाखल झाली होती. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून, नेरळ पोलीस पुढील तपास करत आहेत. (Top 15 News)
9) विरोधकांचे डिपॉझिट जप्त होणार
गिरीश महाजनांचा दावा
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी माध्यमांशी बोलताना महाजन यांनी महायुतीचे १२ उमेदवार बिनविरोध विजयी झाल्याची माहिती दिली. उर्वरित नऊ उमेदवारही मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्हा बँकेवर महायुतीची बहुमताने सत्ता येईल, असा दावाही त्यांनी केला. इतकेच नव्हे, तर या निवडणुकीत विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल, असे भाकीत महाजन यांनी वर्तवले. त्यांच्या या वक्तव्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय वातावरण चर्चेत आलेय. (Top 15 News)
10) ‘शेतकरी जगला पाहिजे, टिकला पाहिजे’
नांदेडमध्ये संभाजी ब्रिगेडची दुष्काळ चिंतन परिषद
संभाजी ब्रिगेडच्या वर्धापन दिनानिमित्त आणि महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जन्मोत्सवाला समर्पित शेतकरी दुष्काळ चिंतन व संघर्ष परिषदेचे नांदेडमध्ये आयोजन करण्यात आले. ‘शेतकरी जगला पाहिजे, टिकला पाहिजे’ या भूमिकेतून झालेल्या परिषदेत रब्बी हंगामातील दुष्काळावर मात करण्याचे उपाय, शाश्वत शेती आणि कमी खर्चातील शेती पद्धतींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पाण्याचे अपुरे व्यवस्थापन, रासायनिक खतांचा अतिवापर आणि वृक्षतोड ही दुष्काळाची प्रमुख कारणे असल्याचे मत वक्त्यांनी व्यक्त केले. पात्र शेतकऱ्यांना तातडीची मदत, जलसंधारण, गाळमुक्त धरणे, हमीभाव, वेळेत पीकविमा आणि नुकसानभरपाई देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. (Top 15 News)
11) इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी नवी समीकरणं?
नेतान्याहू आणि आयसेनकोट यांची महत्त्वाची बैठक
इस्रायलमध्ये सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून, कट्टर राजकीय विरोधक बिन्यामिन नेतान्याहू आणि आयसेनकोट यांची लवकरच महत्त्वाची बैठक होणार आहे. इस्रायली संसदेत नेतान्याहू यांच्या आघाडीला ५३, विरोधी पक्षांच्या आघाडीला ४८, तर अरब पक्षांना १९ जागा मिळाल्या आहेत. मात्र, सरकार स्थापनेसाठी आवश्यक असलेला ६१ जागांचा आकडा कोणत्याही गटाला गाठता आलेला नाही. या पार्श्वभूमीवर नेतान्याहू यांनी आयसेनकोट यांच्यासोबत रोटेशन पद्धतीने पंतप्रधानपद स्वीकारण्याचा प्रस्ताव मांडल्याची माहिती आहे. दोन्ही नेत्यांमध्ये तेल अवीवमधील इस्रायल संरक्षण दलाच्या (IDF) मुख्यालयात चर्चा होणार असून, त्यात प्रस्तावाच्या अटी आणि सत्तास्थापनेबाबत विचारविनिमय होण्याची शक्यता आहे. (Top 15 News)
12) खिशाला परवडणारा 5G स्मार्टफोन
5000mAh बॅटरीसह दोन नवे रंग लॉन्च
आयटेलने आपल्या City 300 5G स्मार्टफोनसाठी डार्क रुबी आणि मिस्ट बेज हे दोन नवीन रंग सादर केलेत. यापूर्वी हा फोन बोल्ड इंडिगो रंगात उपलब्ध होता. या स्मार्टफोनमध्ये ६.६७ इंचांचा HD+ पंच-होल डिस्प्ले असून, १२०Hz रिफ्रेश रेट देण्यात आलाय. फोनमध्ये T8200 ऑक्टा-कोर 5G प्रोसेसर आणि ४GB रॅम मिळते. तसेच ५०००mAh क्षमतेची बॅटरी, टाइप-C चार्जिंग आणि १० वॉट चार्जर देण्यात आलाय. फोटोग्राफीसाठी १३ मेगापिक्सलचा ऑटोफोकस रिअर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. अल्ट्रालिंक फ्री कॉलिंगची सुविधाही देण्यात आलीय. या स्मार्टफोनची किंमत १४,९९९ रुपये आहे. (Top 15 News)
13) महिंद्राचा भन्नाट ट्रॅक्टर
डिझेलऐवजी इथेनॉल-पेट्रोल मिश्रणावर चालणार
महिंद्रा ट्रॅक्टर्सने शेतकऱ्यांसाठी पर्यायी इंधनावर चालणारा नवा ट्रॅक्टर सादर केलाय. नागपूर येथे आयोजित अॅग्रोव्हिजन २०२६ कृषी प्रदर्शनात कंपनीने ४९ एचपी क्षमतेचा इथेनॉल फ्लेक्स-फ्युएल ट्रॅक्टर प्रदर्शित केला. युवो टेक+ प्लॅटफॉर्मवर आधारित हा ट्रॅक्टर इथेनॉल आणि पेट्रोलच्या मिश्रणावर चालू शकतो. ऊस, मका तसेच शेतीतील अवशेषांपासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा यात वापर करता येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या ट्रॅक्टरचे प्रात्यक्षिक पाहिले. प्रदर्शनात कंपनीने नोव्हो ६०५ डीआय पीएस ४ डब्ल्यूडी आणि ओजा २१३० ही दोन मॉडेल्सही सादर केली. या नव्या ट्रॅक्टरची किंमत आणि व्यावसायिक विक्रीची तारीख कंपनीने अद्याप जाहीर केलेली नाही. (Top 15 News)
14) शर्वरीच्या ‘ये प्रेम मोल लिया’ची बॉक्स ऑफिसवर बाजी
जिनिलियाच्या ‘गनमास्टर G9’ला टाकले मागे
शर्वरी वाघ आणि आयुष्मान खुराना यांच्या ‘ये प्रेम मोल लिया’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जिनिलिया आणि इमरान हाश्मी यांच्या ‘गनमास्टर G9’ला मागे टाकलेय. प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी ‘ये प्रेम मोल लिया’ने भारतात ५.२५ कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली. पहिल्या दिवशीच्या ४ कोटींच्या तुलनेत कमाईत ३१.३ टक्क्यांची वाढ झाली. दोन दिवसांत भारतातील निव्वळ कमाई ९.२५ कोटी, तर जगभरातील एकूण ग्रॉस कमाई १८.७५ कोटी रुपयांवर पोहोचली. दुसरीकडे, ‘गनमास्टर G9’ने दुसऱ्या दिवशी भारतात ४.३५ कोटींची निव्वळ कमाई केली. या चित्रपटाची दोन दिवसांतील भारतातील निव्वळ कमाई ८ कोटी, तर जगभरातील ग्रॉस कमाई १०.३० कोटी रुपये झाली. आगामी दिवसांत प्रेक्षकांचा प्रतिसाद कोणत्या चित्रपटाला मिळतो, याकडे लक्ष लागलेय. (Top 15 News)
15) आकाश दीपला बाउन्सर
काईल जेमीसनचे वादग्रस्त वक्तव्य व्हायरल
क्राइस्टचर्च कसोटीत काईल जेमिसनचे दोन बाउन्सर डोक्याला लागल्याने भारतीय वेगवान गोलंदाज आकाश दीप सामन्यातून बाहेर झाला. त्यानंतर स्टंप माईकवर कैद झालेले जेमीसनचे क्रूर वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाले. तो म्हणाला, “त्यांनी आम्हाला बाउन्सर टाकले होते, मी त्याची काळजी का करू? त्यांनी टाकले होते तर आम्हीही परतफेड करू; सुरुवात आम्ही केली नाही, पण शेवट आम्हीच करू.” वेलिंग्टन एकदिवसीय सामन्यात अंशुल कंबोजच्या बाउन्सरमुळे ब्लेयर टिकनरला कन्कशन झाले होते; त्याचाच हिशोब किवींनी चुकता केल्याची चर्चा आहे. (Top 15 News)





