Sanjay Raut Vs Ajit Pawar: ‘सुप्रियाताई, लाडका सारडा पिंक कसा झाला.?’; संजय राऊत यांचा अजित पवारांना जोरदार टोला

Ajit Pawar | Pink Jacket । Sanjay Raut : लोकसभा निवडणुकीत फक्त एकच खासदार निवडून आल्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रयत्न सुरु केले असल्याचे दिसत आहे. विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने अजित पवार गटाने मोर्चेबांधणी आणि रणनीती आखण्यास सुरुवात केलीय.
या सगळ्यात घडामोडी सुरु असताना अजित पवार यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तो म्हणजे यापुढे अजित पवार गटाकडून त्यांच्या कार्यक्रमांमध्ये, बॅनर्सवर, जाहिराती आणि व्यासपीठावर गुलाबी रंगाचा अधिकाअधिक वापर केला जात असल्याचं दिसून येत आहे.
गुलाबी रंग मतदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनावर बिंबवण्यासाठी स्वत: अजित पवार प्रयत्न करत असल्याचे दिसून येतंय. त्यासाठी त्यांनी यापुढे अजित पवार हे पांढऱ्या रंगाच्या कुर्त्यावर केवळ गुलाबी जॅकेट परिधान करणार आहेत. एवढंच नाही तर त्यासाठी अजित पवारांनी 12 गुलाबी रंगाची जॅकेट शिवून घेतल्याचेही बोललं जात.
याशिवाय, अजित पवार यांनी कुर्ता आणि जॅकेटवर राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हे चिन्ह लावण्यासही सुरुवात केलीय. अजित पवार यांच्या पक्षाने अचानक गुलाबी रंगाचा इतका वापर सुरु केल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होताना दिसते.
त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे. ‘सुप्रिया ताई, तुमच्या लाडक्या भावाने पिंक रंग वापरायला सुरुवात केली आहे. ताई, सरडा पिंक कसा झाला?’ असा खोचक सवाल संजय राऊत यांनी केला. संजय राऊत यांनी हा सवाल करताच सभागृहात एकच हास्यकल्लोळ उडाला.
महाविकास आघाडीचा माटुंग्याच्या षण्मुखानंद हॉलमध्ये मेळावा पार पडला. या मेळाव्याला ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेस नेते नाना पटोले आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. सर्वच नेत्यांची यावेळी भाषणे झाली. यावेळी बोलताना खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांना पिंक रंगावरून जोरदार टोले लगावले.
संजय राऊत म्हणाले की, “सुप्रिया सुळे या महाराष्ट्राची लाडकी बहीण आहेत. या बहिणीसाठीच बारामतीत महाराष्ट्र लढला. तुमच्या लाडक्या भावाने तर आता रंग बदलला आहे. ते पिंक झाले आहेत. सरडा रंग बदलतो. पण तो अचानक पिंक कसा होऊ शकतो? असा सवाल केला.
गुलाबी रंग हा महाराष्ट्राचा रंग नाही. महाराष्ट्राचा रंग भगवा आणि तिरंगा आहे. केसीआर यांनी तेलंगणात गुलाबी रंग घेतला. त्यांचा पराभव झाला. हे सुद्धा जातील, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.





