Rahul Narwekarl : राहुल नार्वेकरांनी आदिवासींच्या जमिनी बळकावल्याचा आरोप; संजय राऊतांना दिले प्रत्युत्तर
राहुल नार्वेकरांनी आरोप फेटाळले

Rahul Narwekarl : शिवसेना ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कथित जमीन खरेदी व्यवहाराची आणि गरीब आदिवासींच्या जमिनी बळकावल्याच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
याबाबत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात अलिबाग तालुक्यातील, रायगड जिल्ह्यातील खडाळे गावातील सुमारे २० आदिवासी कुटुंबांचा प्रश्न मांडला आहे. घरे पाडून वीज-पाणी तोडल्याने त्यांना विस्थापित केल्याचा आरोप आहे.
राहुल नार्वेकर यांच्या मनमानी वर्तनाविरोधात अलिबाग तालुक्यातील आदिवासी समाज गेल्या काही काळापासून आंदोलन करत आहे व पोलीस यंत्रणा त्या आदिवासींवर जबरदस्ती करत त्यांना पळवून लावत आहेत, असा गंभीर आरोप या पत्रात संजय राऊत यांनी केला आहे. संबंधित जमीन राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या पत्नी सरोजिनी राहुल नार्वेकर यांच्या नावे खरेदी केल्याचा दावाही पत्रात केला आहे.
आदिवासी कुटुंबांचे संरक्षण करून त्यांचे संपूर्ण पुनर्वसन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करावा. म्हात्रोळी गावातील येथे कातकरी आदिवासी कुटुंबाच्या जमिनीचा बेकायदेशीर कब्जा घेऊन त्यांचे घर तोडून संपूर्ण कुटुंबाला विस्थापित करण्याचा प्रकार महाराष्ट्राच्या प्रतिमेस कलंक लावणारा आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात संजय राऊत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी सांविधानिक पदावर काम करणाऱ्या व्यक्तीने कसं वागू नये याचे हे उत्तम उदाहरण आहे. अलिबाग तालुक्यातील आदिवासींच्या जमीनींवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून बेकायदेशीर पद्धतीने अतिक्रमण करण्यात येत असल्याचा आरोप सतत करण्यात आला आहे. आदिवासी त्यांच्या जमीन घरांसाठी आंदोलन करत असताना सरकार कुठे आहे? कोणाच्या बाजूने आहे?, असा सवाल संजय राऊत यांनी केला.
आदिवासी-कातकरी कुटुंबांनी आक्रोश केला तेव्हा वाडीपासून २-३ किलोमीटर अंतरावरील पर्यायी जागेत राहायला जबरदस्ती करण्यात आली. काही कुटुंबांना थोडे पैसे दिले गेले, तर काहींना काहीही दिले नाही. या जमिनीवर आता आमचा कब्जा आहे असे धमकवण्यात आले.
विधानसभा अध्यक्षांची ही कृती गुंड प्रवृत्तीचीच आहे. महाराष्ट्र शासनाने ४ जानेवारी २०१७ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार ही कुटुंबे त्यांच्या घराखालील जमिनीचे मालक आहेत. ही नोंद अलिबाग तहसीलदाराच्या सर्वेक्षण रेकॉर्डमध्ये असल्याचेही त्यांनी सांगितले.
राहुल नार्वेकरांनी आरोप फेटाळले
आता या प्रकरणावर राहुल नार्वेकर यांनी आपली बाजू मांडत संजय राऊत यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. संबंधित जमीन आदिवासींची नसून भोगवटा क्रमांक 1 मधील असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
2024 पर्यंत या जमिनीची मालकी बलदेवसिंह जाला यांच्याकडे होती. त्या काळात दाखल झालेल्या तक्रारींमध्ये नार्वेकर कुटुंबीयांचे नाव नव्हते. नार्वेकर यांच्या पत्नीने 2024 नंतर जाला यांच्याकडून ही जमीन खरेदी केली. त्यामुळे यापूर्वीच्या तक्रारींशी नार्वेकर कुटुंबाचा संबंध जोडणे चुकीचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तसेच 2024 पूर्वी आदिवासी बांधवांनी केलेल्या तक्रारींचा निपटारा झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा:





