अख्खा महाराष्ट्र भावूक ! सुप्रिया सुळेंनी बजावली आत्याबाईंची भूमिका; राज ठाकरेंशेजारी आदित्य, तर उद्धव काकांजवळ अमित

मुंबई : मुंबईतील वरळी डोम येथे आज एक न भूतो न भविष्यती असा भव्य सोहळा पार पडला, जिथे तब्बल 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र आले. मराठी भाषेच्या रक्षणासाठी आयोजित विजयी जल्लोष मेळाव्यात केवळ ठाकरे बंधूंनीच नव्हे, तर त्यांच्या पुढच्या पिढीतील आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनीही एकत्र येऊन उपस्थितांचं मन जिंकलं.
या ऐतिहासिक क्षणाला खऱ्या अर्थाने साकारण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी मोलाची भूमिका बजावली, ज्यांनी ‘आत्याबाई’ बनून ठाकरे कुटुंबीयांना एकत्र आणलं.
सुप्रिया सुळेंची ‘आत्याबाई’ भूमिका
सुप्रिया सुळे यांनी या सोहळ्यात भावनिक आणि राजकीय एकतेचा सुंदर मिलाफ घडवला. त्यांनी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांना हाताला धरून व्यासपीठावर पुढे आणलं. यावेळी आदित्य यांना राज ठाकरेंच्या शेजारी आणि अमित यांना उद्धव ठाकरेंच्या शेजारी उभं करत एक प्रतीकात्मक फॅमिली फ्रेम तयार केली. या क्षणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटाने स्वागत केलं, तर सोशल मीडियावरही हा क्षण व्हायरल झाला. सुप्रिया यांनी दोन्ही चुलत भावांना एकमेकांच्या जवळ आणत ठाकरे कुटुंबीयांची एकी आणि मराठी अस्मितेचं बळ अधोरेखित केलं.
ठाकरे बंधूंची ग्रँड एन्ट्री, भावूक क्षण
मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधात आयोजित या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकमेकांना मिठी मारली, हा क्षण पाहून अवघा महाराष्ट्र भावूक झाला. 19 वर्षांनंतर एकत्र आलेल्या या बंधूंनी आपल्या प्रभावी भाषणांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं.
दरम्यान, विजयी मेळावा संपल्यानंतर ठाकरे कुटुंबीयांनी एकत्र फोटो काढले. यावेळी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंनी देखील स्टेजवर पुढे येत हातात हात मिळवला.
बाळासाहेब ठाकरेंसह अनेकांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं : राज ठाकरे
आजचा हा मेळावा, मोर्चा आणि मेळाव्याला तीच घोषणा आहे. कोणताही झेंडा नाही. मराठी हाच अजेंडा. माझ्या मराठीकडे कुणी वेड्या वाकड्या नजरेनं पाहायचं नाही. कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचं मी मुलाखतीत म्हटलं होतं. आज २० वर्षानंतर आम्ही एका व्यासपिठावर येत आहे. बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं,” असा थेट टोलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर….
“हिंदी सक्तीचे अचानक कुठून आले, ते मला समजलेच नाही. हिंदी कशासाठी? कोणासाठी हिंदी? त्या लहान मुलांवरती जबरदस्ती करताय तुम्ही? कुणालाही न विचारता आम्ही ते लादणार असे झाले. तुमच्या हातात सत्ता असेल, ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर…. मोर्चालाही तीच घोषणा होती. आताही तिच आहे. कोणताही झेंडा नाही. मराठी हाच अजेंडा. माझ्या मराठीकडे, महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने कुणी पाहायचं नाही,असा इशारच राज ठाकरेंनी सरकारला इशारा दिला आहे. Raj Thackeray |
आम्ही एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी : उद्धव ठाकरे
ठाकरे बंधूंनी मराठी भाषेच्या मुद्यावर केंंद्रस्थानी ठेऊन राज्य सरकारवर टीकेचे बाण सोडले. आमच्या अंतर्पाठ अनाजी पंतांनी दूर केला, एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी, असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात नवी नांदी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या रुपाने पाहायला मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत.





